
हिरव्या माळरानांवर फुलणारी विविध रंगी फुले म्हणजे जणू धरणी मातेचे इंद्रधनुष्य असते. संगमेश्वर देवरुख मार्गावर साडवली येथे माळरानावर सध्या सर्वत्र दीपकाडीच्या पांढऱ्या फुलांची दुलई पसरल्याचे मनमोहक दृश्य पहायला मिळत आहे. दीपकाडीचा समावेश संकटग्रस्त प्रजातीमध्ये करण्यात आला आहे. दीपकाडीला, गुलछडी असेही म्हटले जाते. यावर्षी पावासाला उशीरा सुरुवात झाली असली तरी, दीपकाडीची मनमोहक फुलं श्रावणाआधी आषाढाचे स्वागत करत आहेत. परिणामी हिरव्यागार निसर्गात शुभ्र फुलांची जणू आषाढवारीच सुरु असल्याचा भास होत आहे.
साडवलीच्या माळारानावरील हा अनोखा नजारा पाहण्यासाठी केवळ स्थानिक ग्रामस्थच येतात असे नव्हे, तर संगमेश्वर तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची पावलं देखील हा सुंदर नजारा पाहून जागीच थबकतात. दीपकाडीचा हा सुंदर नजारा छायाबद्ध करण्यासाठी मोबाईल आणि कॅमेरे घेऊन निसर्गप्रेमी साडवलीच्या माळरानावर फिरताना दिसून येतात. दीपकाडी ही वनस्पती अत्यंत नाजूक असल्याने पर्यटकांनी ती पायदळी तुडवू नये तसेच छायाचित्रे घेताना देखील या वनस्पतीचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन सृष्टी ज्ञान संस्थेने केले आहे.
दीपकाडी म्हणजेच गुलछडीची कथा उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी सुरु होते. कातळाच्या गर्भातून प्रकटलेल्या हिरव्या गार पाती वाढत जाऊन एका दांडीच्या रुपात मोठ्या होतात. आषाढाच्या दिवसभर पडणाऱ्या पावसात त्यांना अलगद कळ्या येतात. दांडीच्या टोकाला पांढरे शुभ्र गायमुखी फुलं आले, की नंतरच या वनस्पतीचे महत्व अधोरेखित होते. हिरवागार शालू नेसलेला काळा कातळ सडा वर्षभर दुर्लक्षित असला, तरी या पांढऱ्या फुलांनी तो अचानक नजरेत भरू लागतो. एक दोन अशी शेकडो फुलं एकच वेळी फुलू लागतात. मधमाश्या, फुलपाखरं पतंग येऊ लागले की त्यांच्या वावराने सडा जिवंत होतो. चरणारी गुरं , फुलांवर लपून बसलेले कोळी आणि इतर कीटक, अलगद फिरणारे पीपिट आणि चंडोल, पाय पडला की अचानक उड्या मारणारी बेडूक असे सर्वच जीव या फुलोऱ्याच्या आश्रयाला येतात अशी माहिती प्रतीक मोरे यांनी दिली.
यावर्षी मे महिन्यातच पावासाला सुरुवात झाल्यामुळे दीपकाडीची सर्व फुलं लवकर बहरून श्रावणाआधी आषाढ महिण्याचे स्वागत करत आहेत , शिवाय निसर्गात आपला एक अनोखा अविष्कार सादर करुन स्वतःच्या नाजूकपणा बरोबर आपलं वेगळेपणही दाखवून देण्यात यशस्वी होत आहेत. साडवली येथील १६ एकर परिसरात सध्या दीपकाडीची फुलं दाटीवाटीने फुलायला सुरुवात झाली असून ,ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. निसर्गाचा हा अद्भुत अविष्कार पाहण्यासाठी निसर्ग प्रेमींची साडवली परिसरात गर्दी होवू लागली आहे.


























































