
आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडून टीम इंडियात स्थान मिळवलेला ‘बेबी बॉस’ अर्थात वैभव सूर्यवंशी पुन्हा चर्चेत आला आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात दोन अर्धशतकांसह चौकार-षटकारांची आतषबाजी करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या वैभवने आयसीसीच्या ताज्या टी-20 क्रमवारीमध्ये हनुमान उडी घेतले आहे. वैभवने थोडी थोडकी नाही तर तब्बल 230 स्थानांची झेप घेत टॉप-50 मध्ये जागा मिळवली आहे. तर दुसरीकडे वन डे क्रमवारीमध्ये कर्णधार शुभमन गिल याने अव्वल स्थान पटकावले आहे.
हिंदुस्थानचा संघ नुकताच झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वाखाली खेळताना हिंदुस्थानने यजमान संघाला व्हाईट वॉश देत 3-0 असा मालिका विजय मिळवला होता. या मालिकेमध्ये सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने 3 लढतीत 151 धावा चोपल्या होत्या. 50.33 च्या सरासरीने त्याने या धावा केल्या. या दमदार कामगिरीचे बक्षीस म्हणून त्याला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याचा फायदा त्याला आयसीसी क्रमवारीमध्येही झाला.
More accolades for India’s teenage sensation on the latest rankings update as Daryl Mitchell’s seven-month stay at the top of the ODI batting charts is over 😲https://t.co/AjjfI9jHIQ
— ICC (@ICC) July 29, 2026
दरम्यान, टी-20 क्रमवारीमध्ये हिंदुस्थानचा विकेट किपर बॅटर ईशान किशन अव्वल स्थानावर कायम आहे. झिम्बाब्वेविरुद्ध अखेरच्या लढतीत त्याने 81 धावांची खेळी केली होती. सध्या त्याचे 912 रेटिंग गुण आहेत. तर वन डे क्रमवारीमध्ये शुभमन गिल याने पहिले स्थान पटकावले आहे. न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेत डॅरेल मिचेलला काही खास कामगिरी करता आली नव्हती आणि याचा फटका त्याला बसला. तो दुसऱ्या स्थानावर घसरला असून गिल पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
जाडेजाचे पुनरागमन; सारांश जैन नवीन चेहरा; श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा




























































