
ओडिशामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली असून, आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या विविध भागांत आलेल्या या पुराचा फटका २ लाखांहून अधिक नागरिकांना बसला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील सर्व प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, अनेक नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. PTI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ओडिशात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, तर रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली असून, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
प्रशासनाकडून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून, पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न वेगाने केले जात आहेत. राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला असून, आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव पथके ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहेत.


























































