
खासदार वाढवण्यापेक्षा युवकांच्या रोजगाराच्या संधी वाढवून दाखवा, असे म्हणत डिलिमिटेशन विधेयकावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. डिंपल पब्लिकेशनच्या नवीन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना ते असे म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “डिलिमिटेशन विधेयक परत आणण्यासाठी खासदार फोडले जात आहेत. सत्ता तुम्हाला कशासाठी दिली आहे? तुम्हाला सत्ता देश चालवण्यासाठी दिली. अच्छे दिन आयेंगे, असं तुम्ही सांगितलं होतं, म्हणून तुम्हाला सत्ता दिली. ते काम बाजूला ठेवून तुमचे सगळे मंत्री आणि सगळा लवाजमा लावून, तुम्ही आमचे पक्ष फोडण्यामध्ये वेळ घालवत आहात. का? कारण तुम्हाला घटना बदलायची आहे. दोन तृतीयांश बहुमत पाहिजे, नवीन विधेयक आणायचंय, आणा. विधेयक चांगलं आणा. जो तरुण रस्त्यावर उतरलाय, त्याचं समाधान होईल, असं विधेयक आणा.”
उद्धव ठाकरे म्हणाले की, “हे डिलिमिटेशनचं विधेयक आणल्यानंतर काय होणार? आज जे साडेपाचशे खासदार आहेत, ते साडेआठशे होणार. खासदार वाढतील, पण पुढे काय होईल? बोलायला देणार आहात का तुम्ही तेवढ्यांना? आजच तुम्ही सगळ्यांनी बघितलं, मी स्वतः तिथे हजर होतो. राहुल गांधी बोलत असताना त्यांनी एक शब्द वापरला, ‘मूर्ख’ हा शब्द वापरला – ‘इडियट’. तो असंसदीय आहे, काढून टाका. त्यांना बोलूच देत नाहीत. शेवटी सदस्यसंख्या किती? आमची जेवढी होती, ती तुम्ही फोडलीत. त्या सदस्यसंख्येनुसार तुम्ही बोलण्याचा वेळ ठरवता. ठेवा ना ज्याला जे बोलायचंय ते. अगदी वाह्यात बोलू नका, अजिबात नाही; पण जे बोलायचंय, ते नेमकेपणाने बोलायला त्यांना वेळ तर द्या. तो वेळ तुम्ही देणार नाही. मग साडेपाचशे लोकांना जर तुम्ही बोलायला वेळ देऊ शकत नाही, तर उद्या साडेआठशे लोक आली, तर वेळ कसा देणार तुम्ही?”
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “माझं स्पष्ट मत आहे की, खासदार वाढवण्यापेक्षा या युवकांच्या रोजगाराच्या संधी वाढवून दाखवा. युवकांच्या रोजगाराच्या संधी वाढवल्या, तर तुम्ही खासदार कितीही वाढवा, डिलिमिटेशन करण्याची गरज पडणार नाही; हे लोक, हेच युवक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील.”


























































