CWG 2026 – हिंदुस्थानच्या बॉक्सर्सनी प्रतिस्पर्ध्यांचा धुरळा उडवला; एकाच दिवशी 5 पदके निश्चित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Commonwealth Games 2026 च्या सातव्या दिवशी हिंदुस्थानच्या बॉक्सर्सनी धुरळा उडवून दिला आहे. आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर एकाच दिवशी 5 पदके निश्चित केली आहेत. साक्षी चौधरी, अरुंधती चौधरी, सचिन सिवाच, अंकुश यादव आणि नरेंद्र बेरवाल यांनी आपापल्या वजनी गटातील उपांत्य फेरीत (Semifinals) स्थान मिळवले आहे.

महिलांच्या 51 किलो वजनी गटात साक्षीने उत्तर आयर्लंडच्या कॅटलिन फ्रायर्सचा, तर अरुंधतीने (70 किलो) न्यूझीलंडच्या मॉर्गन हेंडरसनचा पराभव केला. पुरुषांमध्ये सचिनने (60 किलो) बोत्सवानाच्या ट्रेझर मोरेमीला, अंकुशने (80 किलो) सेशल्सच्या जेड मिकॉकला, आणि नरेंद्रने (90+ किलो) सामोआच्या मायकल सेकोला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली.

याआधी मंगळवारी जादुमणी सिंग, प्रीती पवार आणि प्रिया गांगस यांनी आपापले उपांत्यपूर्व (Quarterfinal) सामने जिंकून पदके पक्की केली होती. तर ऑलिंपिक पदक विजेती लव्हलिना बोरगोहेन हिला थेट प्रवेश मिळाल्यामुळे तिचेही पदक निश्चित झाले होते. या यशामुळे हिंदुस्थानचे कमीत कमी 9 बॉक्सर्स पदकावर आपले नाव कोरणार हे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, परवीन हुड्डा आणि कपिल पोखरीया यांना मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले.