
देशातील सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, २०२० ते २०२४ या चार वर्षांच्या काळात हे प्रमाण जवळपास तिपटीने वाढले आहे. २०२० मध्ये देशभरात सायबर फसवणुकीचे १०,३९५ गुन्हे दाखल झाले होते, तर २०२४ मध्ये हा आकडा २९,७५८ वर पोहोचला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री बंडी संजय कुमार यांनी बुधवारी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही धक्कादायक आकडेवारी सादर केली. PTI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये सायबर फसवणुकीच्या बाबतीत तेलंगणा राज्य देशात आघाडीवर आहे. तेलंगणामध्ये सर्वाधिक १८,९२२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ बिहारमध्ये ४,०२० गुन्हे दाखल झाले असून, महाराष्ट्र या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात २,८२७ सायबर फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आले आहेत, तर ओडिशामध्ये १,५४६ प्रकरणांची नोंद झाली आहे.
गुन्हेगारांनी फसवणुकीसाठी विविध अत्याधुनिक पद्धतींचा अवलंब केल्याचे या आकडेवारीतून समोर आले आहे. २०२४ मध्ये सर्वाधिक गुन्हे हे ऑनलाइन बँकिंग फसवणुकीचे असून त्यांची संख्या ४,६५९ इतकी आहे. या व्यतिरिक्त क्रेडिट किंवा डेबिट कार्ड फसवणुकीची ३,८२९ प्रकरणे, मार्केटिंग आणि गुंतवणूक फसवणुकीची ३,०४४ प्रकरणे, तर एटीएम फसवणुकीची १,६५९ प्रकरणे समोर आली आहेत. तसेच फेक कॉल्स किंवा विशिंगद्वारे १,२६४, गेमिंग ॲप्सच्या माध्यमातून १,०१९ आणि ओटीपी फसवणुकीचे ९६५ गुन्हे दाखल झाले आहेत.


























































