
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या तडाखेबंद भाषणानंतर लोकसभेत झालेल्या गदारोळाचा फायदा घेत परीक्षा सुधारणा विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. हे विधेयक मंजूर होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघेही सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे संसद भवनात चर्चा रंगली होती.
नीटसह विविध केंद्रीय परीक्षांच्या पेपरफुटीमुळे देशभरात सध्या संताप आहे. नुकतेच या मुद्दय़ावर जेन-झी आंदोलन झाले व शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे हादरलेल्या केंद्र सरकारने लगेचच परीक्षा सुधारणा विधेयक आणण्याची घोषणा केली. त्यानुसार आज हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. यावर चर्चा सुरू असताना राहुल यांनी सरकारवर तोफ डागल्यामुळे मोठा गदारोळ झाला. त्यातच आवाजी मतदानाने विधेयक मंजूर करण्यात आले. तर राज्यसभेत ‘वंदे मातरम्’ विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.
सुधारित विधेयकात नवे काय?
पेपरफुटीच्या प्रकरणावर सुनावणीसाठी प्रत्येक राज्यात फास्ट ट्रक कोर्ट
पेपरफुटीच्या प्रकरणांची चौकशी दहा महिन्यांत पूर्ण करण्याचे बंधन
दोषी व्यक्तीला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि 50 लाखांचा दंड
पेपरफुटीमागे संघटित टोळी असल्यास 10 कोटींचा दंड

























































