ठाण्याच्या आयुक्तांवर हक्कभंग आणा! निमंत्रण पत्रिकेवरून भाजप, शिंदे गटांत मानापमान नाट्य; महापालिकेत राडा, भाजपच्या आमदारांचे विधान परिषदेच्या सभापतींना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणे शहरातील विविध विकासकामांच्या झालेल्या उद्घाटन कार्यक्रमांना सत्ताधारी शिंदे गटाने भाजपचे आमदार व उपमहापौर यांना डावलल्यामुळे पालिकेत सध्या राजकीय राडा झाला आहे. निमंत्रण पत्रिकेवरून भाजप आणि शिंदे गटात मानापमान नाट्य रंगले असतानाच आता आमदार निरंजन डावखरे हेदेखील संतापले आहेत. उपमहापौर व लोकप्रतिनिधींवर अन्याय करणारे ठाणे पालिकेचे आयुक्त सौरभ राव व संबंधित अधिकाऱ्यांवर थेट हक्कभंग आणा, अशी मागणी डावखरे यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी यासंदर्भात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना पत्रही पाठवले आहे.

ठाण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेचा असूनही या उद्घाटनाला शहरातील भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह नगरसेवकांना जाणूनबुजून डावलण्यात आले असल्याचा आरोप कृष्णा पाटील यांनी केला. तसेच या सर्व विकासकामांचे पुन्हा उद्घाटन करावे, अशी मागणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे त्यांनी पत्राद्वारे केली आहे. आता तर मानापमान नाट्यात आमदार निरंजन डावखरे यांनीदेखील एण्ट्री घेतली आहे. त्यांनी थेट आयुक्तांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दिला असल्याने महायुतीमधील बेबनाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

भाजप आम्हाला संपवेल अशी शिंदे गटाला भीती

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालेली विकासकामे ही केंद्र व राज्य सरकार आणि महापालिकेच्या अनुदानातून करण्यात आली होती. त्याचा शुभारंभ संयुक्तपणे करणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात भाजपचे आमदार आणि नगरसेवक यांना विचारलेही नाही. एवढेच नव्हे तर उपमहापौर या नात्याने मलाही कार्यक्रमांना बोलावले नसल्याची खंत कृष्णा पाटील यांनी व्यक्त केली आहे. भाजप आम्हाला संपवेल अशी शिंदे गटाला भीती असून असे प्रकार वारंवार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा उपमहापौरांनी दिला आहे.

आता हक्कभंग समिती लक्ष घालेल

ठाणे महापालिकेच्या कोणत्याही विकासकामांचे उद्घाटन करताना सर्वच लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्याची पद्धत आहे. त्यानुसार प्रशासनाने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. निष्पक्ष भूमिका घेऊन सर्व लोकप्रतिनिधींना उद्घाटनाना बोलवायला हवे होते. मात्र अशा उद्घाटनाना आम्हाला का बोलावले नाही? तसेच यासंदर्भात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना निवेदन देण्यात आले असून हक्कभंग समिती त्यात लक्ष घालेल, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.

निवडणुकीत युती आणि उ‌द्घाटनाला फक्त तुम्ही?

शिंदे गटाने भाजपला डावलल्याने आमदार संजय केळकर हेदेखील संतप्त झाले आहेत. ते म्हणाले की, उद्घाटन कार्यक्रमांना आम्हाला बोलावले जात नाही ही पालिकेची चूक आहे. निवडणुकीत युती आणि उद्घाटनाला फक्त तुम्ही हे योग्य नाही. शिंदे गटाच्या मनात नेमके काय चालू आहे हे आम्हाला माहीत असून यापुढे थोडा विचार करावा लागेल, असा धमकीवजा इशाराच केळकर यांनी दिला आहे.