
पाच लाखांच्या बिलासाठी मृतदेह देण्यास खारघरच्या मेडिकव्हर रुग्णालयाने नकार दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याची दखल घेत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापनाला धारेवर धरले. त्यानंतर ताळ्यावर आलेल्या रुग्णालयाने मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.
कामोठे येथील अमर पाटील (66) यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र दोन दिवसांनंतर पाटील यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाने 17 लाखांचे बिल भरा मग मृतदेह ताब्यात देऊ, अशी अरेरावी केली. विशेष म्हणजे रुग्णाला दाखल करताना दोन लाख आधी भरले होते. त्यानंतर मेडिक्लेममधून आणखी दहा लाख मंजूर झाले होते. असे असताना रुग्णालयाने आणखी पाच लाखांसाठी तगादा लावला होता. याबाबत नातेवाईक चंद्रकांत जगदाळे यांनी माहिती देताच शिव आरोग्य सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष डॉ. परेश देशमुख व समन्वय सचिव मीनल गरुड यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाला धारेवर धरत खडसावले. त्यानंतर रुग्णालयाने मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.
झोमॅटो बॉयला मदतीचा हात
उलवे येथील झोमॅटो डिलेव्हरी बॉय विशाल शिंदे (४२) याचा बेलापूर येथे अपघात झाला होता. त्याला अपोलो रुग्णालयाने उपचाराचा खर्च १ लाख २७ हजार रुपये सांगितला. त्याच्या पत्नीने कसेबसे ३० हजार रुपये रुग्णालयात भरले. मात्र ऑन ड्युटी नसल्याने कंपनीने इन्शुरन्स देण्यास नकार दिला. याबाबत माहिती मिळताच शिव आरोग्य सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉ. परेश देशमुख, पनवेल तालुका संघटक दिगंबर पाटील, खारघर विभाग संघटक रोशन शिंदे यांनी पाठपुरावा केल्यानंतर कंपनीने १ लाख १२ हजार रुपयांचा इन्शुरन्स मंजूर केला. तसेच अपोलो रुग्णालयानेदेखील आधी भरलेल्या ३० हजारांपैकी २२ हजार रुग्णाला परत केले.






























































