
विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी कर्जरोखे काढण्याची वेळ आलेल्या ठाणे महापालिकेला अक्षरशः कडकी लागली आहे.
पालिकेच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी पैसे दिले जातात. यंदाही पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांना त्यांच्या खात्यात थेट पैसे दिले जाणार असले तरी गणवेषातून रेनकोट आणि स्वेटरला वगळले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होणार असून त्याचा भुर्दंड पालकांवर पडणार आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह लंच बॉक्स, वॉटर बाटली, स्वेटर, रेनकोट खरेदी करण्यासाठी पैसे दिले जातात. हे पैसे थेट मुलांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा होतात. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पालिकेच्या शिक्षण विभागाला ६ कोटी ९७ लाख रुपये लागणार होते. पण प्रत्यक्षात ७९ लाख रुपये कमी पडत होते. पुरेशा निधी उपलब्ध होणार नसल्याने शैक्षणिक साहित्यापासून मुले वंचित राहणार होती. या संदर्भातील ठराव महासभेत मंजुरीसाठी दाखल झाला होता. पण गटनेत्यांच्या झालेल्या बैठकीत कमी पडणारे ७९ लाख रुपये प्रशासनाकडून मंजूर करून घेण्यात येतील असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त मिताली संचेती यांनी दै. ‘सामना’शी बोलताना दिली.
बिले सादर केल्यानंतरच बँकेत जमा होतात पैसे
डीबीटी योजना पालिकेच्या विद्यार्थ्यांना लागू असली तरी आधी पालकांना पैसे खर्च करून वह्या, पुस्तके, गणवेश, स्वेटर व अन्य शैक्षणिक साहित्य खरेदी करावे लागते. या सर्व वस्तूंची बिले पालकांनी शिक्षण विभागाला सादर केल्यानंतर त्यास मंजुरी दिली जाते आणि त्यानंतर हे पैसे काही कालावधीनंतर मुलांच्या खात्यात थेट डीबीटी च्या माध्यमातून जमा केले जातात. यावर्षी पालिकेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे.






























































