
अमेरिका आणि इराणमधील युद्ध पुन्हा भडकले आहे. दोन्ही देशांमध्ये भीषण हवाई हल्ले सुरू असल्याने आखातात युद्धाचे सायरन वाजू लागले आहेत. 28 फेब्रुवारीला सुरू झालेले युद्ध मधल्या काळामध्ये थांबले होते आणि शांतता करार झाला होता. मात्र त्यानंतर अचानक हा करार मोडला आणि हवाई हल्ले सुरू झाले.
इराणने दोन दिवसांपूर्वी जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. या हल्ल्याला आता अमेरिकेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकन सैन्याने बुधवारी उशिरा इराणमधील अनेक महत्त्वाच्या सैन्य तळांवर भीषण हवाई हल्ले केले. अमेरिकन सेंट्रल कमांडने याबाबत माहिती दिली आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्याअनेक ठिकाणांना या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आल्याचे अमेरिकन सेंट्रल कमांडने स्पष्ट केले.
— U.S. Central Command (@CENTCOM) July 30, 2026
मंगळवारी इराणने जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळ आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवर क्षेपणास्त्रे डागली होती. अमेरिकन सैन्याने इराणची सर्व क्षेपणास्त्रे हवेतच यशस्वीरीत्या नष्ट केली. या हल्ल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत अमेरिकेने इराणवर मोठा प्रतिहल्ला केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या हल्ल्याचा इशारा दिला होता.
आम्ही इराणावर अत्यंत जोरदार प्रहार करणार आहोत, कारण आता हल्ला करण्याची आमची पाळी आहे. आम्ही काय करणार आहोत याची त्यांना पूर्ण कल्पना आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर अमेरिकन लष्कराने इराणचे लष्करी कमांड सेंटर्स, क्षेपणास्त्र आणि ड्रोननिर्मिती केंद्र, किनारी देखरेख यंत्रणा तसेच सागरी युद्धक्षमता असलेल्या तळांवर एकापाठोपाठ एक हल्ले केले. हे हल्ले अमेरिकन वेळेनुसार गुरुवारी पहाटे सुरू झाले. जवळपास तासभर हे हल्ले सुरू होते.
दरम्यान, इराणच्या आयआरजीसीने जॉर्डनमधील अमेरिकन हवाई तळावर हल्ला केल्याची कबुली दिली. तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या तीन तेल टँकर्सवरही कारवाई केल्याचा दावा इराणने केला आहे.





























































