
पावसाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सदनामध्ये प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. जंतरमंतरवरून संसदेवर निघालेल्या मोर्चावेळी विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला लाठीचार्ज आणि पेलेट गनच्या वापरावरून विरोधक आक्रमक झाले. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे उत्तर मागितले आहे. यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात केलेल्या जोरदार घोषणाबाजी आणि गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
दुसरीकडे राज्यसभेमध्येही गदारोळ सुरू आहे. पेपर फुटीचे प्रकरण, विद्यार्थ्यांची आंदोलने आणि सत्ताधारी-विरोधकांमधील जोरदार खडाजंगीनंतर बुधवारी लोकसभेत मंजूर झालेले परीक्षा सुधारणा विधेयक, 2026 गुरुवारी राज्यसभेत चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी आणले जाण्याची शक्यता आहे. यावरही वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
संसदेच्या आवारात विरोधी खासदारांचे आंदोलन
दिल्लीतील जंतरमंतरवर 20 जुलै रोजी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ आणि अयोध्येतील राम मंदिर देणग्यांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीच्या खासदारांनी गुरुवारी संसदेच्या मकर द्वार येथे निदर्शने केली. हातात फलक घेऊन जमलेल्या खासदारांनी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे आदेश कोणी दिले? असा सवाल केला. तसेच, विद्यार्थ्यांवरील बल प्रयोगाबद्दल केंद्राकडून उत्तरदायित्व आणि श्री रामजन्मभूमी मंदिराच्या देणग्यांमधील कथित आर्थिक अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? संसद भवन परिसरात विरोधकांचे आंदोलन, अमित शहांना सवाल pic.twitter.com/mpqx45oSsA
— Saamana Online (@SaamanaOnline) July 30, 2026




























































