
आसाममधील पूरपरिस्थिती अजूनही गंभीर असून मदत व बचावकार्य सुरू आहे. बुधवारी शिवसागर आणि गोलाघाट जिल्ह्यांत तीन जणांचा मृत्यू झाला. यंदाच्या पुरातील मृतांची एकूण संख्या 78 वर पोहोचली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) जारी केलेल्या ताज्या माहितीनुसार, राज्यातील ७ जिल्ह्यांमधील 3 लाखांहून अधिक नागरिक अजूनही पुराच्या तडाख्यात आहेत.
शिवसागरमध्ये 2 आणि गोलाघाटमध्ये 1 अशा एकूण 3 नवीन मृत्यूंची नोंद झाली आहे. शिवसागर, चराईदेव, गोलाघाट, जोरहाट, नागाव, विश्वनाथ आणि कामरूप मेट्रोपॉलिटन या 7 जिल्ह्यांतील 3 लाखांहून अधिक नागरिकांना पूराचा फटका बसला आहे. अद्याप ५५१ गावं आणि २१,५२३ हेक्टर शेती पाण्याखाली आहेत.
चराईदेव जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून तेथे 1,37,561 नागरिकांना पूराचा तडाखा बसला आहे. त्यापाठोपाठ शिवसागर (84600) आणि जोरहाट (49111) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. विस्थापित झालेल्या 16500 पेक्षा जास्त नागरिकांनी 71 मदत शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे. 30 मदत केंद्रांच्या माध्यमातून 72000 हून अधिक पूरग्रस्तांना अत्यावश्यक मदत पुरवली जात आहे.
दरम्यान, मंगळवारी विस्थापित नागरिकांची संख्या 3.32 लाख होती, त्या तुलनेत काही भागांत पुराचे पाणी किंचित ओसरले असले तरी हवामान खात्याने पुन्हा पावसाचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.



























































