
नीट पेपरफुटीविरोधातील विद्यार्थी आंदोलनादरम्यान सुरक्षा दलांच्या पेलेट गन चालवण्याच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मुद्द्यावर देशभरातील वातावरण तापले आहे. तसेच विरोधी पक्ष आक्रमक असून ते या मुद्द्यावर सरकारला जाब विचारत आहेत. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर सीआरपीएफचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी मोठे विधान केले आहे. आपण याची जबाबदारी स्वीकारत आहोत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
सीआरपीएफचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी पेलेट गन चालवण्याच्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारली आहे. पेलेट गनच्या वापरावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सिंग म्हणाले, मी त्याची जबाबदारी घेत आहे. कर्तव्यावर असताना सैनिकांनी घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी घेण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
सीआरपीएफच्या पदग्रहण समारंभात बोलताना, ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी सैनिकांना आश्वासन दिले की, ते ऑपरेशनल बटालियनमध्ये तैनात असोत किंवा कायदा आणि सुव्यवस्था युनिटमध्ये, राष्ट्रीय हित, जनहित आणि दलाच्या हितासाठी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाची जबाबदारी ते घेतील. त्यांनी सैनिकांना निर्भयपणे आपले काम सुरू ठेवण्याचे आवाहन केले. जिथे गरज असेल, तिथे सीआरपीएफचे महासंचालक म्हणून ते जबाबदारी स्वीकारतील, असे त्यांनी सांगितले.
पूर्वीच्या एका अहवालानुसार, सीआरपीएफ मुख्यालयाने आपल्या सर्व क्षेत्रीय युनिट्सना एक संदेश पाठवून अलीकडील तैनातीदरम्यान सैनिकांनी दाखवलेल्या संयम आणि धैर्याची प्रशंसा केली होती. सीआरपीएफने हे देखील स्पष्ट केले की, कोणत्याही स्तरावर हेतुपुरस्सर निष्काळजीपणा किंवा कायद्याचे उल्लंघन आढळल्यास, नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
या संपूर्ण प्रकरणात सीआरपीएफच्या रॅपिड ॲक्शन फोर्सच्या (आरएएफ) भूमिकेवरही चर्चा सुरू आहे. २० जुलै रोजी कॉकरोच जनता पक्षाने पुकारलेल्या संसद मोर्चादरम्यान जंतर मंतर आणि दिल्लीच्या इतर भागांतील जमावाला नियंत्रित करण्याच्या आरएएफच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आरएएफ हे सीआरपीएफचे एक विशेष पथक आहे, जे दंगली आणि सार्वजनिक अशांततेसारख्या परिस्थिती हाताळण्यासाठी १९९२ मध्ये स्थापन करण्यात आले.
Delhi: CRPF Director General Gyanendra Pratap Singh attends the Grand Investiture Ceremony of the CRPF.
He says, “…I want to assure all of you that whether it is our operational battalions or our law and order units, whatever decisions you take and whatever actions you take in… pic.twitter.com/DCW3y92s1F
— IANS (@ians_india) July 29, 2026
२० जुलै रोजी संसद मोर्चादरम्यान जंतर मंतर आणि त्याच्या आसपास हजारो आंदोलक जमले होते. मिळालेल्या माहितीनुसार, हा जमाव संसद भवनाच्या जवळ पोहोचला होता. त्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामुळे विद्यार्थी आणि आंदोलकांवर केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर पेलेट गनचा वापर केल्याचा आरोपही केला आहे. त्या पार्श्वभूमीवर सिंह यांच्या वक्तव्याला महत्त्व आले आहे.




























































