
हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील अत्यंत बहुप्रतीक्षित ‘रामायण’ या भव्य चित्रपटाचा पहिला ट्रेलर अखेर 30 जुलै रोजी ब्रह्ममुहूर्तावर पाच हिंदुस्थानी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित आणि दोन भागांत बनत असलेल्या या चित्रपटाच्या पहिल्या भागाचा ट्रेलर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असून, यात प्रभू राम आणि रावण यांच्यातील महायुद्धाची भव्य झलक पाहायला मिळते. यात रणबीर कपूर शांत आणि प्रभावी प्रभू रामाच्या भूमिकेत तर यश आक्रमक आणि दरारा निर्माण करणाऱ्या रावणाने भूमिकेत दिसत आहे.
नमित मल्होत्राच्या प्राईम फोकस स्टुडिओ, डीएनईजी आणि यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सच्या सहकार्याने निर्मित हा चित्रपट 2026 च्या दिवाळीत जगभरात प्रदर्शित होणार असून, याचे जागतिक वितरण सोनी पिक्चर्स टेलिव्हिजन आणि उत्तर हिंदुस्थानातील वितरण धर्मा प्रॉडक्शन्स करणार आहे. 4 मिनिटे 9 सेकंदांच्या या ट्रेलरची सुरुवात यशने साकारलेल्या रावणाच्या फकिराच्या वेशात राजवाड्यात प्रवेश करण्यापासून होते. रक्षक ओळख विचारल्यावर तो स्वतःला ‘तुमचा नवीन राजा’ असे म्हणतो आणि त्यानंतर देवलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोकवर फक्त रावणराज असण्याची घोषणा करतो. संपूर्ण ट्रेलरमध्ये यशचा रावणाच्या भूमिकेतील राग, प्रभावी वावर आणि अभिनय विशेष उठून दिसतो. रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत शांत आणि प्रभावी वाटत असून, तो महाकाय प्राणी व राक्षसांशी लढताना दिसतो. साई पल्लवीने सीतेची आणि लारा दत्ताने कैकेयीची भूमिका साकारली आहे. याशिवाय रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत, राकुल प्रीत शूर्पणखेच्या भूमिकेत आणि अरुण गोविल राजा दशरथाच्या भूमिकेत दिसत आहेत. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापल्याचे दृश्यही ट्रेलरमध्ये आहे. मात्र, या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या सनी देओलची कोणतीही झलक या लांबलचक ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेली नाही.
View this post on Instagram
वाल्मिकी ऋषींच्या अजरामर महाकाव्यावर आधारित या चित्रपटाची पटकथा पुरस्कार विजेते लेखक श्रीधर राघवन यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे संगीत ऑस्कर विजेते संगीतकार हान्स झिमर आणि ए. आर. रहमान यांनी संयुक्तपणे दिले आहे.






























































