
रत्नागिरी शहरात कालपासून स्विगी आणि झोमॅटो च्या ऑर्डरचे वितरण करणाऱ्या डिलिव्हरी बॉईज कंपन्याच्या जाचक अटी आणि धोरणाविरोधात कामबंद आंदोलन पुकारले होते.या कामगारांच्या मदतीसाठी युवासेना धावली. युवासेनेचे रत्नागिरी जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी स्वीगी आणि केएफसीच्या व्यवस्थापकांना धारेवर धरत कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला.युवासेनेच्या आक्रमकतेनंतर दोन्ही कंपन्याचे प्रशासन वठणीवर आले आहे.
रत्नागिरी शहरातील ‘केएफसी’ रेस्टॉरंटमधील दुरवस्था हे मुख्य कामबंद आंदोलनाचे प्रमुख कारण होते. रेस्टॉरंटच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते डिलिव्हरी पिकअप काउंटरपर्यंतच्या मजल्यावर तब्बल 3 माणसे एकाच वेळी पडतील एवढे मोठे आणि भयानक खड्डे पडले होते. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे अनेक डिलिव्हरी बॉईज ऑर्डर पिकअप करताना पडून गंभीर जखमी झाले होते. वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कर्मचाऱ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले. दुसरीकडे, स्विगी कंपनीच्या स्थानिक प्रबंधकाने कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या सुट्ट्यांवर गदा आणणारा एक जाचक आदेश काढला होता. आजारपण किंवा कोणतीही तातडीची आणीबाणीची परिस्थिती उद्भवली, तरीही कर्मचाऱ्यांनी सुट्टी घेऊ नये, अशी सक्ती केली जात होती. जर कोणी सुट्टी घेतली, तर त्याच्या जागी नवीन भरती केली जाईल, अशी थेट धमकीच व्यवस्थापनाकडून दिली जात होती.
या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी आज युवासेना जिल्हा युवाध्श्रीकारी प्रसाद सावंत यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रसाद सावंत यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट केएफसीचे रेस्टॉरंट गाठले आणि तिथल्या व्यवस्थापकासोबत चर्चा केली. सावंत यांच्या कडक भूमिकेनंतर व्यवस्थापनाने तातडीने नमते घेतले. त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात डिलिव्हरी बॉईजचा पिकअप पॉईंट बदलून दिला, तसेच खड्डे असलेल्या भागाचे काम तात्काळ युद्धपातळीवर करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर प्रसाद सावंत यांनी ‘स्विगी’च्या व्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांना आपल्या खास शैलीत कडक तंबी दिली. “कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय खपवून घेतला जाणार नाही,” असा सज्जड दम त्यांनी भरला. युवासेनेच्या या आक्रमक पवित्र्यापुढे स्विगीच्या व्यस्थापकाने अखेर माघार घेतली. कोणत्याही डिलिव्हरी कर्मचाऱ्यावर यापुढे अन्याय होणार नाही आणि सुट्टीच्या कारणावरून कोणालाही काढले जाणार नाही, अशी हमी व्यस्थापकांनी दिली.






























































