
परभणी ते जिंतूर महामार्गावर पावसाच्या धुवांधार सरी सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरहून परभणीकडे जाणाऱ्या एसटी बसचे ब्रेक फेल झाले. त्यातच पावसाने निसरड्या झालेल्या रस्त्यावर टायर घसरल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस थेट रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात २७ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ९ प्रवाशांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस क्रमांक MH 20 BL 2240 ही ५१ प्रवाशांना घेऊन छत्रपती संभाजीनगर वरून परभणी-जिंतूर मार्गाने जात होती. राष्ट्रीय महामार्गावर बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदज पाटीजवळ बस आली असता, अचानक गाडीचे ब्रेक फेल झाले. त्यातच जोरदार पाऊस सुरू असल्याने रस्ता अत्यंत निसरडा झाला होता. ब्रेक न लागल्याने आणि टायर स्लिप झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले अन् बस रस्त्याच्या बाजूला एका अंगावर कोसळून पलटी झाली. अपघात घडताच प्रवाशांमध्ये एकच आक्रोश आणि किंचाळ्यांचा कल्लोळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी सह पथक व महामार्ग पोलीस उपनिरीक्षक/नेव्हल आणि पोलीस अंमलदार महेश केदारी व सूर्यकांत हाके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची तीव्रता पाहून स्थानिक प्रशासनाने तत्काळ रुग्णवाहिका बोलावून सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी शासकीय दवाखाना, जिंतूर येथे हलवले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली असून पुढील कारवाई बोरी पोलीस ठाणे करत आहे. प्राथमिक उपचार करून सदरील जखमी रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालय परभणी या ठिकाणी हलविण्यात आले आहे.
जखमींची यादी: गंभीर जखमी (०९ प्रवासी):
लक्ष्मीबाई श्रीधर नंदफुले (९०, रा. जिंतूर)
कांताबाई विश्वेश्वर नंदफुले (३८, रा. जिंतूर)
गजानन ज्ञानदेव दुगाने (२७, रा. जोगवाडा, ता. जिंतूर)
मजर खान शुकुर खान (५२, रा. परभणी)
गौतम अंबुरे (५०, रा. जिंतूर)
निळकंठ किशोर चाटे (रा. जिंतूर)
सुनैया बेग सय्यद (६०, रा. जिंतूर)
सय्यद अल्सा सय्यद बेग (६०, रा. जिंतूर)
जयश्री शिव आप्पा बेद्रे (५०, रा. जिंतूर)
> किरकोळ जखमी (१८ प्रवासी):
रब्बानी बी सय्यद अफसर (५५, जिंतूर), लीलावती किशन चव्हाण (६५, वरूड), सुनिता बालासाहेब कोकाटे (३०, जिंतूर), शेख मेरू मिया शेख मुसा (६०, जिंतूर), सुनिया बी शेख मुसा (३५, जिंतूर), शतश्री छगन कुमार घोडके (१७, वसमत), रुजे बालाजी घोडके (७०, पाचेगाव), प्रकाश आबासाहेब खरात (५५, मंठा), फर्जना अमिन कुरेशी (४०, मंठा), महादेव शिवाजी खिस्ते (७०, परभणी), माधवराव सटवाजी खिस्ते (६०, परभणी), शिवकन्या मुरली कंठाळे (२५, जिंतूर), बसचालक गोविंद सिताराम नागरगोजे (५०, परळी), मंगेश मुरली कंठाळे (६५, जिंतूर), विनायक लक्ष्मण घुगे (४४, जिंतूर), शेख जाबेर शेख इब्राहिम (४५, जिंतूर), पवन ज्ञानदेव दुबळकर (१९, काना), बालासाहेब आश्रुबा लिपणे (६०, निरवाडी यासह अनेक जणांना किरकोळ मार लागला आहे.






























































