निष्क्रिय, भ्रष्ट प्रशासनाचा निषेध; शिवसेनेचा महापौरांच्या दालनात ठिय्या, महापालिका प्रवेशद्वारावर निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक येथे नादुरुस्त रस्त्यांमुळे अख्खे शहर खड्ड्यात गेले असून, आतापर्यंत अपघातात पाच जणांचा बळी गेला आहे. याप्रकरणी महापौर आणि आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, त्वरित रस्ते दुरुस्ती करा, भ्रष्टाचाराची चौकशी करा आदी मागण्या करीत शिवसेनेने गुरुवारी महापालिकेवर धडक दिली. मृतांना श्रद्धांजली वाहत महापालिका प्रवेशद्वारावर निदर्शने केली. शहराच्या दुरवस्थेचे उत्तर मागण्यासाठी नगरसेवकांनी महापौर हिमगौरी आडके यांच्या दालनात ठिय्या दिला.

कुंभमेळ्यानिमित्त कामांसाठी मुख्य अठ्ठावीस रस्ते गेल्या अनेक महिन्यांपासून खोदून ठेवले आहेत. शहरातील मुख्य व अंतर्गत रस्ते खड्ड्यांमध्ये हरवले आहेत. दिवसभर सर्वत्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या दुरुस्तीसाठी शेकडो कोटी रुपये खर्च करण्यात आले, तरीही शहर खड्ड्यात गेले. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होवून निकृष्ट दर्जाची कामे झाली, यामुळे रस्त्यांचे तीनतेरा वाजले. दिवसेंदिवस अपघातात नागरिकांचे बळी जात आहेत, अनेक जखमी मृत्यूशी झुंज देत आहेत. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, रस्ते दुरुस्तीसाठी धोरण ठरवावे, यासाठी विशेष महासभा घेण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने यापूर्वीच आयुक्तांची भेट घेवून केली होती. प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी या मागणीकडे आणि रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले.

खड्डे अपघाताने आतापर्यंत पाच नाशिककरांना जीव गमवावे लागले. सत्ताधारी भाजपा, एकनाथ शिंदे गटाला जाग आणण्यासाठी गुरुवारी शिवसेनेने महापालिकेत धडक दिली. गटनेते केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवकांनी अपघातातील मृतांचे फोटो हातात घेवून निदर्शने केली. मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. निष्क्रिय प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा धिक्कार केला. ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘रस्ते भ्रष्टाचाराची चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करा’, ‘नाशिकमधील खड्डे – भ्रष्टाचाराचे अड्डे’ आदी घोषणांनी महापालिका मुख्यालय दणाणून गेले होते. शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, अपघातातील पाच बळी याला जबाबदार कोण, याचे उत्तर द्या, अशी मागणी करण्यात आली. घोषणाबाजी करीत नगरसेवक व शिवसैनिकांनी महापौरांचे दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी गटनेते केशव पोरजे, नगरसेवक प्रथमेश गीते, शैलेश ढगे, मुरलीधर भामरे, योगेश गाडेकर, योगेश भोर, नगरसेविका भारती ताजनपुरे, मंगला आढाव, वैशाली दाणी, वैशाली दळवी, सीमा पवार, माधुरी डेमसे, रूचिरा साळवे, प्रमिला मैंद, संजीवनी हांडोरे, राहुल ताजनपुरे, मदन डेमसे, विशाल पवार, संजय हांडोरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

मृत कोतकर यांच्या पत्नी आंदोलनात

सिडकोच्या कामटवाडे येथील रहिवाशी नीलेश कोतकर हे मंगळवारी एक्स्लो पॉइंट येथे दुचाकीवरून जाताना खड्ड्यात पडले, गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी ज्योती कोतकर या चार वर्षाच्या मुलीसह शिवसेनेच्या आंदोलनात सहभागी झाल्या. आमचा आधार हरपला आहे, उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने नुकसान भरपाई द्यावी, महापालिका सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. विविध भागात शहरात जे पाच बळी गेले, त्या सर्व कुटुंबांना न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली.

शिंदे गटाची पोटदुखी

शिवसेनेचे आंदोलन सुरू झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाच्या दोन नगरसेवकांनीही खड्ड्यांविरोधात महापालिकेत आंदोलन सुरू केले. शिवसेनेला श्रेय जाण्याच्या पोटदुखीने या गटाने हे पाऊल उचलले. त्यांचे उपमहापौर, गटनेते कुठे आहेत, असा सवाल केशव पोरजे यांनी केला. भाजपाबरोबर सत्तेत जावून पश्चाताप झाल्याने त्यांचे सर्व नगरसेवक दु:खी आहेत, त्यांच्या गटाचे दोन गट झाले आहेत. नाशिककरांसाठी रस्त्यावर उतरून शिंदे गटाने सत्तेतून बाहेर पडावे, असे आवाहन पोरजे यांनी केले.