
आजचं दृश्य पाहात बसावं असं आहे. पहिले सगळे दिवस मला आठवले. सगळीकडे भगवा माहोल… आणि हाच भगवा केवळ परत एकदा आपल्याला केवळ महाराष्ट्राच्या विधानसभेवरती नाही तर लाल किल्ल्यावरती फडकवायचा आहे, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ केंद्र सरकारवर धडाडली. ज्ञानेश कुमार ही सत्ताधाऱ्यांची बेंबी, तिच्या रक्षणासाठी दोन लाख पोलीसफाटा उभा केलाय, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… आजचं दृश्य पाहात बसावं असं आहे. पहिले सगळे दिवस मला आठवले. सगळीकडे भगवा माहोल… आणि हाच भगवा परत एकदा आपल्याला केवळ महाराष्ट्राच्या विधानसभेवरती नाही तर लाल किल्ल्यावरती फडकवायचा आहे. आणि पहिल्यासारखं वातावरण एवढ्यासाठी बोललो की ही आपली ओळख आहे. पवित्र भगवा, जो भगवा शिवरायांनी घेतला होता, जो भगवा शिवसेनाप्रमुखांनी आपल्या हातामध्ये दिला होता तोच हा पवित्र निखळ आणि पवित्र तेजस्वी भगवा. निशाणीचा झेंडा वेगळा ठेवा. पण आपली ओळख कोणी चोरू शकत नाही. कितीही दरोडेखोर येऊ दे पण आमचा भगवा तुम्ही चोरू शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.
आजचा मेळावा विशेष आहे. एकतर शिवसेनाप्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. शिवसेनाच्या दसरा मेळाव्याची जी परंपरा आहे ती हिरक महोत्सवी परंपरा आहे. त्याचा हा हिरक महोत्सवी मेळावा आहे. प्रबोधनकारांनी जो नवरात्र उत्सव सुरू केला होता त्याचंही जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि विशेष म्हणजे ज्या शिवाजी पार्कातून शिवसेनाप्रमुखांनी आपली शिवगर्जना प्रथम दिली, पहिला दसरा मेळावा याच शिवतीर्थावर झाला. या मैदानाचं नाव शिवाजी पार्क हे सुद्धा होतं याला या वर्षी १०० वर्षे होताहेत. हा संपूर्ण चांगला योगायोग आहे. हा योगायोग तसा हा कोणी आणला कल्पना नाही. पण शिवसेनाप्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष आणि शिवाजी पार्कच्या नामकराणाचं जन्मशताब्दी वर्ष म्हणजे मैदानासाठी नेता आणि नेत्यासाठी मैदान हे एकाच वर्षी जन्माला आलं. आणि अशा या पवित्र दिवशी आपल्या सर्वांना दसऱ्या शुभेच्छा देतो. असेच सोन्यासारखे तेजाने उजळून निघा. आणि देशाला सुद्धा परत एकदा ती झळाळी प्राप्त करून द्या. शिवसेनाप्रमुखांबद्दल अनेजण अनेकवेळा बोलले आहे. पण त्यांनी जी काही वाक्य त्यावेळेला उच्चारली होती ती आज सुद्धा आपल्या हृदयामध्ये खोलवर कोरून ठेवलेली आहेत. आणि आजच्या घडीला एक वाक्य आठवतंय ते म्हणजे… मेलेली मनं कधी क्रांती करू शकत नाही. जिवंत माणसासारखे वागा मुडद्यासारखे कदापि वागू नका. आणि दुसरं एक वाक्या त्यांचं होतं. क्रांती ही मर्दाची असते आणि शांती ही मुडद्यांची असते. आपण तर मर्दच आहोत. पण खुराड्यातल्या कोंबड्यांसारखं जीणं जगू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
शिवसेनाप्रमुख जे म्हणाचे की एकच दिवस वाघाचं जगा, शंभर दिवस शेळीचं जगण्यापेक्षा एकच दिवस असा जगा की वाघाच्या रुबाबात आपण जगलं पाहिजे. आणि त्याच प्रमाणे खुराड्यातल्या कोंबडीसारखं जगू नका. खुराड्यातली कोंबडी कशा असतात? कापण्यासाठी मालक जिची मान पकडतो तीच फक्त कलकलाट करते. आणि बाकीच्या कोंबड्या तिची मान पकडली माझं काय जातंय म्हणून गुपचूप मालक टाकतोय ते दाणे टिपत बसतेय आणि गलेलठ्ठ होतेय. पण तिचं लक्षात येत नाही की आज तिची मान पकडलीय उद्या माझी पण मान पकडणार आहे. अरे मग यापेक्षा मुंग्या बऱ्या. एवढुशा असतात. मला अनुभव आहे या शिवाजी पार्कवर खेळताना. आता तुम्ही खुर्च्यांवरती बसलाय. पूर्वीचे आपले मेळावे खाली बसून व्हायचे. आणि अनेकदा मुंग्या खाली असायच्या. मुंग्यांवरती पाय पडला, हात पडल्यावर किंवा बुड टेकल्यावर मुंग्या चिरडल्या जायच्या. पण त्या चिरडल्या जाताहेत हे बघून बाकिच्या मुंग्या पळत नाहीत. पण त्या पिसाळून अशा डसतात की जो अवयव त्यांच्यावरती पडेल तो सुजवून टाकतात आणि पाय कितीही मोठा असला तरी त्याला पळून जावं लागतं. हे मुंग्यासारखं जीणं जगलेलं बरं हे कोंबड्यांसारखं जगण्यापेक्षा. याला म्हणतात स्वाभिमान, याला म्हणतात अभिमान, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आज विषय खूप आहेत. बरेचशे विषय माझ्या आधीच्या वक्त्यांनी बोलले आहेत. कैलास पाटील यांनी ग्रामीण भाग सांगितला आहे. दुष्काळी परिस्थिती कशी आहे? सुदैवाने आपल्याला अजून त्याचे चटके, फटके बसत नाहीयेत. पण हा दुष्काळ मोठा आक्राळविक्राळ आहे. आणि आपल्याकडे जी म्हण आहे दुष्काळात तेरावा महिना तसं हे डबल इंजिनचं सरकार इकडे बसलं आहे. नुसतं घोषणा करतंय. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टी झाल्यानंतर मी स्वतः तिकडे गेलो होतो. अक्षरशः जमिनीच्या जमिनी खरवडून गेल्या होत्या खालचे गोटे वरती आले होते. आणि वरचा जमिनीचा थर वाहून गेला होता. विहिरी गाळाने भरल्या होत्या. घरंदारं भांडीकुंडी पुस्तकं-वह्या सगळं आयुष्य वाहून गेलं होतं. आणि मग तेव्हा मुख्यमंत्र्यांनी इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज ३१ हजार कोटी. ज्यांची जमीन खरवडून गेली आहे त्यांना हेक्टरी साडेतीन लाख रूपये. किती जणांना मिळाले? पिकविमा कितीजणांना मिळाला? कारण मी गेल्यावर्षी जेव्हा फिरलो होतो तेव्हा अक्षरशः शेतकऱ्याची चेष्टा चालली होती. ७ रुपयांचा चेक, ११ रुपयांचा आणि आता सुद्धा जी मदत केली पाच हजार रुपयांची हे उपकार नाहीत. नोक किसान योजनेचे दोन हप्ते बाकी आहेत, तेच चार हजार अजून आलेले नाहीत. ते यायचं बाकी आहे. आणि पाच हजार तुम्ही त्यांच्या तोंडावर फेकताय. विम्यासाठी जे काय पाच निकष लावले होते ते निकष लावल्यानंतर शेतकऱ्याला त्याच्या नुकसान भरपाईपोटी विमा मिळाला असता विम्याची रक्कम मिळाली असती. त्या विम्याचे निकषच काढून टाकले की जेणेकरून नुकसान भरपाई देण्याची गरजच लागणार नाही. कर्जमाफी जाहीर झाली. कितीजणांना मिळाले आतापर्यंत कोणालाच माहिती नाही. केंद्रीय पथक येऊन गेलं. काय पाहिलं किती पंचनामे केले? नेमकी मदत किती आणि कोणाला मिळणार? कोणालाच माहिती नाही. आणि शेतकऱ्यांची अवस्था एवढी वाईट आहे. परभणीमध्ये झरी नावाचं आहे. त्यात गावात युवराज बोधवड म्हणून १४ वर्षाचा पोरगा. शाळेत जायला लागला. शाळेची सहल होती. आणि हा युवराज त्याच्या वडिलांच्या मागे लागला की बाबा माझी सहल आहे मला नवीन कपडे पाहिजेत. बाबा शेतकरी. त्यांनी सांगितलं आपलं सोयाबीन विकलं नाही अजून ते विकलं का पैसे येतील आणि त्यातनं तुला कपडे घेईन. पण या पोराने पाहिलं सोयाबीन तर सुकलं. विकणार कसं आणि पैसे येणार कधी? बाकिचे चाललेत सहलीला. दुपारच्या वेळेला घरी कोणी नसताना पत्र्याच्या छताला एक लोखंडी पाईप होता त्या पाईपाला त्याने साडीचा फास केला. आणि गळफास लावून आत्महत्या केली, १४ वर्षांचं पोरगा. नवीन कपडे बाप आल्या मुलाला देऊ शकत नाही. कल्पना करा जी साडी नेसल्यानंतर आई म्हणून जीला तो बिलगत होता त्याच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या आपल्या पोराला बघून आईबापाच्या मनात काय झालं असेल? पण कोणी गेलं का त्याच्याकडे बघायला? हा माझ्या महाराष्ट्रातला गरीब शेतकरी असा आहे. गरीब शेतकरी असा जगतो आणि त्याची पोरं ही अशी मरतात. त्या युवराजने कधी खेळण्यातलं हेलिकॉप्टर सुद्धा घेतलं नसेल आमच्याकडच्या गरीब शेतकऱ्याचं पोर पंचतारांकीत शेतीत हेलिकॉप्टर उडवत जातं. काय थोतांड चाललेत? काय करताय तुम्ही आणि शेतकऱ्याचं मरण हे कोणीच बघायला जात नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
आता संजय राऊत यांनी सांगितलं, काल परवा टायगर श्रॉफवरती हल्ला झाला. हे चमको लगेच गेले भेटायला. पोलिसांनी तत्परतेने ते हल्लेखोर पकडले. ह्याचं कौतुक करायचं की आणखीन काही कारायचं. कारण सुदैवं त्या पोराचं म्हणून तो पोरगा वाचला. पण गोळी जर का वरमी लागली असती आणि मग पोलिसांनी हे गुंड पकडले असते, उपयोग काय? चाटायचं आहे? कोणत्या पद्धतीने तुम्ही सरकार चालवता? संताप याच गोष्टीचा येतो की पोलीस असेल इतर सगळ्या संस्था असतील यांनी स्वतःची फक्त धुणीभांडी करायची बाकी ठेवलेलं आहे, बाकी सगळी कामं यांना दिलेली आहेत. कशा तुमच्या नाकाबंदी असतात? नवरात्र सुरू आहे. आमच्याकडे जरा काही खट्ट झालं की लेगच पोलीस स्टेशनला बोलवतात. मग या पोलिसांना शस्त्र घेऊन येणारे गुंड दिसले नाहीत? काय नाकामध्ये बोळे कोंबले होते तुमच्या नाबंदीच्या वेळेला? ते शस्त्र घेऊन आले कसे? तुम्ही पकडले जरूर. पण जर घात झाला असता तर कोणत्या तोंडाने तुम्ही तुमची टिमकी वाजवली असती? हे शौर्य पदक देण्याच्या लायकीचं काम नाही. मुळामध्ये ते शस्त्र घेऊन आले तेव्हा कळालं पाहिजे होतं आणि तिकडेच तुम्ही त्यांना उडवायला पाहिजे होतं. तर म्हटलं असतं कायद्याचं राज्य आहे, हा महाराष्ट्र आहे. पण कोणाला लाजलज्जा शरम काहीच पडलेली नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फटकारले.
आता याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात एक दावा केलेला आहे. महाराष्ट्र हे शहरी नक्षलवाद्यांचं केंद्र बनलेलं आहे. महाराष्ट्राच्या कुठल्या शहरामध्ये शहरी नक्षलवाद आहे? हे गुंड आले होते ते तुमचे युपी वैगरे तिथून आले होते. ते जाताना पकडले पण येतना कळले नाहीत? आणि त्यांच्याही वरती तो बिश्णोई त्या अमित शहांचा ढोकळा आणि फाफडा खात बसला आहे त्या साबरमती जेलमध्ये. आणि त्याचे गुंड सांगताहेत आमच्याकडे ७० हजार शुटर्स आहेत. फडणवीसजी तुमच्यात जराजरी हिंमत असेल तर जा साबरमतीला आणि तुमचा जो बाप बसला आहे तिकडे दिल्लीमध्ये त्याच्यासमोर त्या बिश्णोईला खेचून इकडे आणून दाखवा. आणि मग गप्पा मारा आमच्याकडे. पण कोणाचं रक्त उकळत नाही. कोणाला त्याचं काही वाटत नाही. माझ्या शिवरायांच्या महाराष्ट्राला शहरी नक्षलवादाचं केंद्र बोलताना तुमची जीभ झडत कशी नाही? छत्रपतींच्या महाराष्ट्राने सर्व क्षेत्रांमध्ये या देशाचं नेतृत्व केलेलं आहे. क्रांतीकारक… मला नाही वाटत देशाच्या कोणत्याही राज्यात एवढे क्रांतिकारक झाले असतील जेवढे महाराष्ट्रामध्ये झालेत. साधू, संत, इतिहासकार, साहित्यिक, लेखक… तुम्ही सांगा महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे. पण त्या परंपरेला कलंक या राज्याचा प्रमुख आपला मुख्यमंत्री करतो. काय शहरी नक्षलवाद, नेमका मला सांगा हो? ही जी मुलं सगळी सस्त्यावरती येताहेत, कशासाठी येताहेत? जो मोदींनी मुहूर्त काढला होता तो कोणता काढलेला? अभिजीत… मग बरोबर ठरला तो. बसला ना दिपके त्यांच्या डोक्यावर. पण ही मुलं तिरंगा घेऊन जाताना तुम्ही त्यांच्या डीप्या उघताहेत. हाता तिरंगा दिसला की चल अंदर. हा तुमचा तिरंग्याचा द्वेष. माझं भागवतांचं काही भांडण नाहीये. संघाशी काही भांडण नाहीये. पण मला आज त्यांना विचारायचं आहे की तुमच्यावरती जी काही टीका होते की तुम्ही स्वातंत्र्यानंतर काही वर्षे तुमच्या मुख्यालयावरती तिरंगा फडकत नव्हता तो द्वेष आजही कायम आहे का? आज सुद्धा तिरंगा यात्रा काढणं हा गुन्हा ठरत असेल तर मग ले के रहेंगे आझादी या शब्दाचा अर्थ नेमका कसा लावायाच हे भागवतसाहेब तुम्ही मला सांगा ना? पण ही मुलं चवताळून रस्त्यावती उतरली आहेत. कारण काय? नशिबच फुटतंय तिकडे. दसऱ्याच्या दिवशी आपण नेहमी सोनं लुटायचं म्हणतो मानतो, भलं ते सोनं सांकेतिक आहे. पण सोनं लुटतो, सोनं घ्या सोन्यासारखे राहा. आमचे पंतप्रधान म्हणतात सोनंच खरेदी करू नका. सोनं लुटायचं तर दूर जिथे आमची लोकशाही लुटली जातेय, जिथे आमची मतं चोरली जाताहेत तिकडे आणखीन काय लुटायचं बाकी ठेवलं आहे? सगळं लुटलंय. सगळं लुटून झाल्यानंतर दादही मागायची नाही. मग या सगळ्या संस्था मग त्याच्यात न्यायालय आलं, सरकार आलं, पोलीस आले, नोकरशाहा आले, मुख्यमंत्री आले. सगळ्यांचे दरवाजे ठोकून झाल्यानंतर जर दात लागत नसेल आणि मग कोणी चिडून संतापून रस्त्यावरती उतरला तर त्याला तुम्ही नक्षलवादी ठरवणार? तुम्ही त्याला गुंड ठरवणार? आणि यांची गुंडगिरी जी चाललेली आहे कोण-कोण नक्षलवादी? आज मला वाटतं मी सगळ्यांची भाषण काय पाहिलेली नाही. पण मोहन भागवत असं म्हणाले की, सगळ्या आंदोलनामध्ये सुद्धा एक सभ्यता पाहिजे. असं म्हणाले असं म्हणतात. बोलले ना कोणी कोणाची सभ्यता पाडायची पाळायची आणि कोणी कोणाची काढायची. जेव्हा दिल्लीमध्ये पहिल्या प्रथम जंतरमंतरला ही सगळी मुलं जेन-झी, अरे आम्ही होतो त्या वयाचे. पण आम्हाला माहितीच नव्हतं या वयात आम्हाला जेन-झी म्हणतात म्हणून. पण ती मुलं रस्त्यावरती उतरली. त्यावेळेला कशा अशा पद्धतीने तुमचे पोलीस लांडगे कसे, लांडग्यासारखे तुटून पडले. त्या मुलीचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल. तो पोलीस एक नालायक, तो सापडला पाहिजे. तो कसा पाठवून काय करत होता. तरी तुम्ही आंदोलनकर्त्यांना सभ्यता शिकवायला जातय? कोणाच्या झिंजा खेचतायत, कोणाचे कपडे फाडतायत कोणाला अक्षरशच्या गुरा ढोरासारखं बडवत नसतील, अशा पद्धतीने मारतायेत. हे टीव्हीवर आम्ही सगळे बघतोय. काल परवाकडे जेव्हा राहुल गांधीनी त्या मुलांना बोलावलं होत त्या मुली आल्या. एकीचे चेहराच वाकडा झालेला. कारण तिनी सांगितलं की एवढं मारलं एवढं मारलं तोंडावरती पंचेस मारले, पोटात लाथा मारल्या. आणखीन काय काय मारलं. एवढे भयानक अत्याचार हे तुमचे लांडगे पोलीस करताय आणि निर्लज्ज सरकार हे तिकडे घांगावर करून बसले आहेत आणि आम्हाला सभ्यता शिकवताय? तळपायची आग मस्तकात जाते असं बघितल्यावर, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
साधी-साधी मुलं पहिल्यांदी रस्त्यावरती उतरले. नीटचा पेपर फुटतोय म्हणून उतरले. घेतला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. आता सुद्धा त्यांचा अधिकार आहे कारण मतचोरी सगळ्यांची होती. विशेषतः नवीन जे मतदार आहेत त्यांच्या बाबत हा प्रकार जास्त होतोय. मतचोरी होताना माझं मत चोरलं जातय तरी देखील मी षंडासारखं गप्प बसतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायचं. जो अन्यायविरुद्ध चिडून पेटून ओटत नाही त्यांनी शिवरायाच नाव घेऊ नये, अजिबात घेता कामा नये. पण आपल्या देशामध्ये जवळपास 13 कोटी नागरिकांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला. 13 कोटी म्हणजे काय साधा आकडा आहे? 13 कोटी म्हणजे आपल्या महाराष्ट्राची पूर्ण लोकसंख्या आहे. म्हणजे मतदान आठ साडे कोटी आहेत. पण पूर्ण लोकसंख्या ही साडेरा साडेबारा कोटी आहे. एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या तुम्ही अचानक मतदारांच्या नकाशातून काढून टाकता. बरं ठीक आहे काढलं तुम्ही, तुम्ही काय बोलला होता आधी बांगलादेशींना इकडे राहण्याचा अधिकार नाही. मग सगळे तेरा कोटी बांगलादेशी आहेत? द्या नावं. कारण सोशल मीडियावरती बऱ्याच गोष्टी येतात. एक रील मी मुद्दामून सेव्ह केलेला आहे. एक महिला उद्वेगाने सांगते की आर्मी ऑफिसर हू मेरे वोट की चोरी हुई है. मी आर्मीची ऑफिसर आहे, माझ्या माझं मत चोरला गेलंय. आता मी त्यांना माझ्या नागरिकत्वाचा काय पुरावा देत बसू. अरे शरम वाटली पाहिजे या राज्यकर्त्यांना. अरे ते तिकडे लढतायत ते तिकडे उभे आहेत म्हणून तुम्ही इकडे तुमच्या सगळ्या तुंबड्या भरताय ना? आणि देश वाचवायला जे तिकडे सीमेवरती उभे आहेत त्यांचेही मतदानाचे अधिकार जर का चोरले जात असतील तर रेजिम चेंज नाही करायचं तर आणखीन काय चेंज करायचं? होय आम्ही रेजिम चेंज करायला उभे राहिलेलो आहोत. का नाही करायचा ते सांगा? बर १३ कोटी जनता बांगलादेशी नसतील. मग आता तुम्ही एक नवीन कायदा केलेला आहे. आणि तुमच्या वेळेला बरोबर आम्ही सुद्धा घोषणा देत होतो. इस देश मे रहना होगा वंदे मातरम कहना होगा. मग हे १३ कोटीमधलं कोणी वंदे मातरम म्हणणार नाहीये? आणि जर ते वंदे मातरम म्हणणारे असतील आणि तुम्ही मतदानाचा अधिकार काढला असेल तर मग त्यांनी वंदे मातरम् बोलायचे की नाही कोण सांगणार मोदी सांगणार, शहा सांगणार की आणखीन कोण सांगणार? पण बेदरकारपणाने तुम्ही कारभार चालवलेला आहात. वाटेल ते करताय. बरं मला एक गोष्ट कळत नाही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला, घ्यावाच लागला द्यायलाच लागणार होता. इकडे ते भीमानवार त्यांना रजेवर पाठवलं. मग ज्ञानेश कुमारचा राजीनामा अजून का घेतला जात नाही? याचं कारण स्वच्छ आहे. कारण जेव्हा रामाने प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला तेव्हा त्याची दहा तोंड एक तोंड उडवलं का दुसरं, दुसर उडवलं का तिसर यायचं. मग विभीषण आला आणि त्यांनी सांगितलं. जसे हे दोन सहआयुक्त बोललेत तसे विभीषण बोलला की अरे त्याचा जीव त्याच्या डोक्यात नाहीये. त्याच्या बेंबीत बाण मार. तशी ज्ञानेश कुमारी यांची बेंबी आहे म्हणून ती बेंबी रक्षण करण्यासाठी तिथे दोन लाख पोलीसफाटा सगळीकडे. जरा तुम्ही काही म्हटलं की लगेच तुमच्यावरती दंडुका चालणार. पण या मुलांना जर का तुम्ही समजून घेतलं नाही. तर परिस्थिती फार वाईट होणार आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
ज्या पोट तिडकीने लोक रस्त्यावरती उतरलेत, मी गेलो होतो, जेव्हा पहिल्यांदा जंतरमंतरवरती बसले होते आणि तो सगळ लाठीमार झाला. आपण इकडे आदल्या दिवशी इकडे जमलो होतो. दुसऱ्या दिवशी सोमवार होता. अनपेक्षितपणाने अत्याचार झाला. मी मंगळवारी तिकडे गेलो. संध्याकाळची वेळ होती अभिजीत दिपकेला भेटलो आणि त्याच्यानंतर मग व्यासपीठावर खाली उतरलो. एक छोटसं स्टेज होतं. खाली सगळी रांगेत आदल्या दिवशी मार खाल्लेली मुलं-मुली बसल्या होत्या. कोणाचं डोकं फुटलंय, कोणाचा पाय प्लास्टरमध्ये, कोणाचा हात तुटलाय. अंगावरती वळ आहे. एक मुलगी होती ती तर तिचा संताप अनावर होता. तिचे कपडे फाडले होते. मी म्हटलं अरे तुम्ही तुम्हाला जखमा झालेत. प्लास्टर केले का बसला तिकडे जा ना घरी, नाही म्हणाले. मेलो तरी बेहत्तर पण आता आम्ही सोडणार नाही. आणि हा राग केवळ नीट पेपरफुटीचा नव्हता. मी जेव्हा त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा संजय राऊत बरोबर एक व्यक्ती बोलत होती. मध्यम वयीन होती. आणि संजयने विचारलं त्याला की आप कहासे आये है. त्याने सांगितलं की मै हू मध्य प्रदेशका पर आया बिहारसे. आप क्यू आय हो? माझा मध्य प्रदेशमध्ये छोटासा कारोबार होता. पण जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा माझं संपूर्ण बरबाद झालो, दिवाळं निघालं. मग मी बिहारमध्ये गेलो. माझ्या डोक्यात तो राग आहे, म्हणून मी यांना पाठिंबा द्यायला आलेलो आहे. हे एवढं बा वर्षांचं संचित आहे, मोदीजी, अमित शहा हे वरवरचं धरू करू नका. हे 12 वर्षे तुम्ही ज्या पद्धतीने देशाला छळलंय. ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांची आर्थिक वाट लावून टाकलेली आहे, त्याचं हे फळ तुम्हाला भोगावंच लागणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
जंतरमंतरच्या गर्दीतून मी निघालो होतो, तेव्हा एका लहान मुलीने मला आवाज दिला. ती अगदी छोटीशी मुलगी होती. मी तिला विचारलं, “अगं, तू एकटी आली आहेस का?” त्यावर ती म्हणाली, “नाही, माझी बहीण आहे. ती माझ्यासोबत आहे.” एवढीशी पोरगी आणि तिची बहीण, दोघीही गळ्यात स्टेथोस्कोप घालून आल्या होत्या. मी त्यांना विचारलं, “एवढ्या गर्दीत तुम्ही दोघी कशा आलात?” त्यावर समजलं की त्यांचे आई-वडीलसुद्धा त्यांच्यासोबत आहेत. म्हणजे मुलांना घेऊन आई-वडील या आंदोलनात उतरले आहेत. आई-वडील आंदोलनात उतरतात आणि तुम्ही त्यांची निर्भत्सना करता? त्यांना ‘दिमागी नक्षल’, ‘झुरळ’ आणि आणखी काय काय म्हणता? ही जी पिढी आहे ना, याच पिढीने आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. क्रांतिकारक याच वयाचे होते. खुदीराम बोस हा 17 वर्षांचा मुलगा होता. त्याने ब्रिटिशांविरुद्ध बॉम्ब फेकला. चापेकर बंधू, आनंद लक्ष्मण कन्हेरे, भगतसिंह, चंद्रशेखर आझाद अशी कितीतरी नावं सांगता येतील. हे सगळे याच वयाचे होते. त्यांनी त्या वेळी क्रांती केली, बलिदान दिलं. त्यांनी बलिदान दिलं नसतं, तर आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असतं का? गर्दीतून मी निघालो होतो, तेव्हा एका लहान मुलीने मला आवाज दिला. ती अगदी छोटीशी मुलगी होती. मी तिला विचारलं, “अगं, तू एकटी आली आहेस का?” त्यावर ती म्हणाली, “नाही, माझी बहीण आहे. ती माझ्यासोबत आहे.” एवढीशी पोरगी आणि तिची बहीण, दोघीही गळ्यात स्टेथोस्कोप घालून आल्या होत्या. मी त्यांना विचारलं, “एवढ्या गर्दीत तुम्ही दोघी कशा आलात?” त्यावर समजलं की त्यांचे आई-वडीलसुद्धा त्यांच्यासोबत आहेत. म्हणजे मुलांना घेऊन आई-वडील या आंदोलनात उतरले आहेत. आई-वडील आंदोलनात उतरतात आणि तुम्ही त्यांची निर्भत्सना करता? त्यांना ‘दिमागी नक्षल’, ‘झुरळ’ आणि आणखी काय काय म्हणता? ही जी पिढी आहे ना, याच पिढीने आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. क्रांतिकारक याच वयाचे होते. खुदीराम बोस हा 17 वर्षांचा मुलगा होता. त्याने ब्रिटिशांविरुद्ध बॉम्ब फेकला. चापेकर बंधू, आनंद लक्ष्मण कन्हेरे, भगतसिंह, चंद्रशेखर आझाद अशी कितीतरी नावं सांगता येतील. हे सगळे याच वयाचे होते. त्यांनी त्या वेळी क्रांती केली, बलिदान दिलं. त्यांनी बलिदान दिलं नसतं, तर आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असतं का? छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला तोरणा किल्ला जिंकला, तेव्हा त्यांचं वय किती होतं? 17 वर्षं. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तेव्हा त्यांचं वय किती होतं? 16 वर्षं. बरोबर ना? आणि शिवरायांनी अफझलखानाचा वध केला, तेव्हा त्यांचं वय किती होतं? सुमारे 29 वर्षं. अफझलखानानेसुद्धा आपल्या शिवरायांना ‘पहाड का चूहा’ म्हटलं होतं. पण त्याच अफझलखानाचं पोट फाडून शिवरायांनी त्याचा कोथळा बाहेर काढला, हे तुम्हाला माहीत आहे ना? त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज याच वयाचे होते. त्या पिढीला अपमानास्पद शब्द वापरणारा अफझलखान आणि आजच्या तरुणांना ‘झुरळ’ किंवा ‘दिमागी नक्षल’ म्हणणारे लोक यांच्यात फरक तो काय? तेव्हा शिवरायांनी अफझलखानाचं पोट फाडलं आणि आता आम्ही तुमचं सरकार फाडलं, तर त्यात चुकलं काय? आम्ही हिंसा करत नाही आहोत ना! आम्ही फक्त आमचा न्याय मागत आहोत. आतापर्यंत जे काही भोगलं, जे काही सहन केलं, त्याबद्दल आम्ही दाद मागत आहोत. आणि ती दाद नीट बोलून मिळणार नसेल, तर मग आम्ही आणखी काय करायचं? तुम्हाला काय वाटतं, सगळ्यांना रस्त्यावर येण्यासाठी दुसरे काही उद्योगधंदे नाहीत? रस्त्यावर उतरणं हा कोणाचा छंद नाही. रस्त्यावर उतरायचं, पोलिसांच्या मागे लागायचं, लाठ्या खायच्या, पुन्हा तुरुंगात जायचं आणि नंतर पोलीस घरी येणार, या सगळ्याचा कोणाला छंद आहे का? मी पोलिसांनाही सांगू इच्छितो की, सगळ्यांनी लांडग्यासारखं वागू नका. तुम्हीसुद्धा याच समाजात राहता. तुमचे कुटुंबीय याच समाजात राहतात. तुमच्या मुलांनाही याच परिस्थितीत मोठं व्हावं लागणार आहे. आज या तरुणांची मान पकडली गेली आहे. उद्या तुमची मान पकडली गेली, तर तुम्हाला वाचवायला कोण येणार? हे तरुण आहेत म्हणून आणि तरुणाईची ताकद आहे म्हणूनच तुम्ही वाचाल. त्यामुळे लांडग्यासारखं वागू नका. आज पोलिसांची परिस्थिती काय आहे, याचाही विचार करा. पाच हजार पदं असतील, तर किती जण त्या पदांसाठी येतात? हजारो लोक येतात. म्हणजेच एवढे लोक तुमची जागा घेण्यासाठी तयार आहेत. ते तुमची जागा घेऊ शकतात. त्यामुळे लाठी मारताना हा लाठीमार उद्या उलटून तुमच्यावर होणार नाही ना, याचाही विचार करा आणि मग लाठी उचला. मुख्यमंत्र्यांनाही मला सांगायचं आहे की, उद्या तिरंगा यात्रा आहे, उद्या आंदोलन आहे, असं म्हटल्यानंतर ज्यांची घरं, पत्ते आणि ओळख तुम्हाला माहीत आहे, त्यांच्या घराघरांत पोलीस पाठवून तुम्ही नोटिसा बजावता. त्यापेक्षा प्रत्यक्षात मारेकरी येतात आणि गोळीबार करून जातात, त्यांच्याकडे लक्ष द्या. ते अतिरेकी आहेत. न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरणारे हे तरुण नक्षलवादी नाहीत. ते त्यांचा हक्क मागत आहेत. ते क्रांतिकारी आहेत. पण आम्हाला कोणाला काही पडलेलं नाही, म्हणून हे सगळं घडतं आहे. तुम्ही नीट विचार केला, तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळातील परिस्थिती पुन्हा मुंबईत निर्माण होताना दिसते आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
काही दिवसांपूर्वी अमित शहा येऊन गेले. त्याआधी संघाचे भैय्याजी जोशी किंवा आणखी कोणीतरी येऊन गेले. घाटकोपरमध्ये गुजराती भाषेचा विषय पुढे आला. त्यानंतर अमित शहा म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील सर्वांत मोठं बहुभाषिक राज्य आहे. आमचे लोक मात्र तिथे बसून दाढी खाजवत होते आणि शेपूट हलवत होते. सत्ता टिकवण्याच्या नादात ते गप्प बसले. त्यांनी उठून ठामपणे सांगायला हवं होतं की, बहुभाषिक वगैरे काहीही असलं, तरी हा मराठी माणसाच्या हक्काचा महाराष्ट्र आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. पण त्यांनी शेपूट घातली. शेपूट कापली गेली की काय, अशी त्यांची अवस्था झाली आहे. आणि आता हेच लोक आम्हाला हिंदुत्व शिकवणार? आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार? हेच अमित शहा गुजरातमध्ये जाऊन म्हणतात की, “गुजरात में हिंदी नहीं बोली जाती.” तामिळनाडूमध्ये जाऊन नमस्कार करून सांगतात, “माफ करो, मुझे तमिल नहीं आती.” पण महाराष्ट्रात मात्र हे सगळे लाचार होऊन बसतात. त्यांना सगळं मिळाल्यानंतर त्यांना वाटतं की, महाराष्ट्र हा लाचारांचा प्रदेश आहे. अजिबात नाही! तुम्ही मतं चोरून सत्तेवर आलेले आहात. तुमच्यात हिंमत असेल, तर बॅलेट पेपरवर मतदान घेऊन दाखवा. मग आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ. महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला जात आहे. महाराष्ट्राला शहरी नक्षलवादाचं केंद्र म्हटलं जात आहे. पण कोणाला काही पडलेलं नाही. हे सगळे सत्तेसाठी लाचार झालेले लोक आहेत. महाराष्ट्राची भाषा आणि महाराष्ट्राची ओळख बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी मुंबई महाराष्ट्राला मिळू नये म्हणून गुजरातने पराकाष्ठा केली होती. पण मराठी माणूस ताठ मानेने उभा राहिला, रस्त्यावर उतरला आणि त्याने रक्त सांडलं. म्हणून मुंबई महाराष्ट्राला मिळाली. आज यांना असं वाटतं की, शिवसेना संपवली की मुंबईचा घास गिळता येईल. पण जरा बघा, तुमचं तोंड किती मोठं झालं आहे! आज गरज पडली तरी तुम्हाला महाराष्ट्र गिळता येणार नाही. आणि गिळण्याचा प्रयत्न केला, तर मराठी माणूस तुमचं पोट फाडून बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. असा हा मर्द मराठी माणूस आहे. यांचे आणखी काय काय चाळे सुरू आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? आपल्याला वरवरचं वातावरण दिसतं. पण गुपचूपपणे आणखी काही गोष्टी सुरू आहेत. विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांतून पुस्तकं काढून टाकण्याचे प्रयत्न केले जात आहेत. एका अनामिक ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आलं. त्यात काही साहित्यिकांची नावं आणि त्यांची पुस्तकं विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात असल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला. ही पुस्तकं म्हणजे जणू काही विष शिकवलं जात आहे, असा आक्षेप घेण्यात आला. पण ही पुस्तकं कोणाची आहेत? ज्यांनी आपल्याला संविधान दिलं, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचं ‘गुलामगिरी’ हे पुस्तक आहे. ही दोन्ही पुस्तकं जातिव्यवस्थेवर आघात करणारी आहेत. जातिव्यवस्थेतील अन्याय उघड करणारी आहेत. ही पुस्तकं अभ्यासक्रमातून काढून टाका, असं सांगितलं जात आहे. म्हणजे यांना पुन्हा तीच जातिव्यवस्था आणायची आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था आणायची आहे. उच्च-नीच, शूद्र-वगैरे अशी विभागणी पुन्हा आणायची आहे. ही पुस्तकं तुम्ही काढून दाखवा! ही पुस्तकं अभ्यासक्रमातून काढून दाखवा! मी हे का म्हणतो आहे? कारण त्या अनामिक ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली. तुम्ही म्हणाल, ते ट्विट कोणीही केलं असेल. हो, कोणीही केलं असेल. पण त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने त्याची दखल घेतली आणि विद्यापीठांना त्याचा आढावा घेण्यास सांगितलं. म्हणजे ज्या घटनाकारांनी संविधान लिहिलं, त्या संविधानाचा आधार घेऊन आणि त्याची शपथ घेऊन तुम्ही खुर्चीवर बसता आहात. आणि त्याच वेळी समाजाला पुन्हा जुन्या जातिव्यवस्थेकडे घेऊन जात आहात. मग देशाच्या स्वातंत्र्याची तुम्ही नासधूस करत आहात. हे स्वातंत्र्य अनेकांच्या बलिदानातून मिळालं आहे. पण नुसत्या बलिदानातूनच स्वातंत्र्य मिळत नाही. विचारवंत झाले नसते, समाजसुधारक झाले नसते, तर आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळालं असतं; पण सामाजिक क्रांती झालीच नसती. पहिल्यांदा समाज सुधारावा लागतो. त्यानंतरच स्वातंत्र्याचं महत्त्व समजतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पुस्तकं अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा विषय निघाला, तेव्हा मला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या विचारांची आठवण झाली. माझ्या आजोबांनी ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळं’ असं पुस्तक लिहिलं होतं. त्याचप्रमाणे मी विचार करू लागलो की, शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वामध्ये नेमकं वेगळं काय होतं? तेव्हा मला असं वाटलं की, त्यांनी राजकारणाचा धर्म आणि धर्माचं राजकारण यांच्यातला फरक दाखवून दिला. शिवसेनाप्रमुखांनी राजकारणामध्ये धर्म आणला, हे खरं आहे. पण तो केवळ हिंदू धर्म नव्हता. त्यामागे 80 टक्के समाजसेवा आणि 20 टक्के राजकारण, हा विचार होता. त्यांना महाराष्ट्र धर्म अपेक्षित होता. महाराष्ट्र धर्म म्हणजे कर्तव्यापासून कधीही न पळणं. कर्तव्याला कधीही चुकायचं नाही. जेव्हा मुंबईत मराठी माणसाला गरज होती, तेव्हा त्याला आत्मविश्वास देण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. जेव्हा देशात बहुसंख्य असलेले हिंदू विखुरलेले होते, भयभीत झाले होते, तेव्हा त्या हिंदूंना आत्मबळ आणि आत्मविश्वास देण्याचं काम शिवसेनाप्रमुखांनी केलं. काश्मिरी पंडितांना जेव्हा स्वतःच्याच घरातून विस्थापित होऊन देशभर फिरावं लागत होतं, तेव्हा त्यांना महाराष्ट्रात हक्काचं घर देण्याचं काम शिवसेनाप्रमुखांनी केलं. हे गाडगेबाबांचं हिंदुत्व होतं. जो बेघर आहे, त्याला घर देणं; जो भुकेला आहे, त्याला अन्न देणं; ज्याच्याकडे वस्त्र नाही, त्याला वस्त्र देणं—हे हिंदुत्व होतं. अमरनाथ यात्रा जेव्हा धोक्यात आली होती, तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी अतिरेक्यांना इथूनच ललकारलं होतं. बाबरी मशीद पाडल्यानंतर आजचे जे काही तथाकथित हिंदुत्ववादी आहेत, ते कपाटाखाली जाऊन लपले होते. त्या काळात हिंदूंना आधार देण्याचं काम बाळासाहेबांनी केलं होतं. तुम्ही म्हणाल, हिंदुत्वाचं काय? बाळासाहेब कट्टर हिंदू होतेच. आम्ही त्याच हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललो आहोत. पण बाळासाहेबांनी अनेक वेळा सांगितलं की, आमचं हिंदुत्व हे केवळ शेंडी-जानव्ह्याचं हिंदुत्व नाही. आमचं हिंदुत्व हे देशभक्तीचं हिंदुत्व आहे. ते राष्ट्रीयत्व आहे. शिवसेनेने रक्तदानाचा विश्वविक्रम केला. आमचं रक्त कोणाला जातं, हे पाहिलं का? आपत्ती आली, मग ती नैसर्गिक असो किंवा अतिरेकी हल्ला असो, जीवाची पर्वा न करता मदतीसाठी धावून जाणारा पहिला शिवसैनिक असतो. हे हिंदुत्व आहे. हा धर्म आहे. राजकारणाचा धर्म काय असावा, हे शिवसेनाप्रमुखांनी दाखवून दिलं. पूर्वी राजे धर्माला आश्रय द्यायचे. त्याचप्रमाणे शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाला आश्रय दिला, हिंदुत्व जपलं. पण आज परिस्थिती बदलली आहे. आज धर्माचं राजकारण सुरू आहे. आज राजाला धर्माचा आश्रय घ्यावा लागत आहे. हातात काम नाही, पण तोंडात ‘जय श्रीराम’—हे आमचं हिंदुत्व नाही. हृदयात राम आणि हाताला काम, हे आमचं हिंदुत्व आहे. हा फरक लक्षात घेण्यासारखा आहे. आपल्याला नेमकं काय दिलं गेलं आणि पुढे काय न्यायचं आहे, याचा विचार केला पाहिजे. हिंदुत्व आमचं आहेच. आम्ही भगवे झेंडे घेऊन आलो आहोत. हा भगवा आमच्या हातातून कोणी खेचून घेऊ शकणार नाही. आम्ही भगवे आहोत. आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. हिंदू म्हणून आमचा रंग भगवा आहे. पण देशभक्त मुसलमान असेल, तर त्याचा रंग हिरवा असू शकतो. देशभक्त बौद्ध असेल, तर त्याचा रंग निळा आहे. इतर देशभक्तांचा रंग पांढरा असू शकतो. पण भाजप नेमकं हेच करत आहे. तिरंग्यातले रंग वेगळे करण्याचं काम. हिरवा वेगळा, निळा वेगळा, पांढरा वेगळा आणि भगवा वेगळा. पण आपण सगळे मिळून तिरंगा आहोत, हे लक्षात राहिलं पाहिजे. तिरंग्यातून अनेकतेत एकता दिसते. हेच आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
बाकी बोलण्यासारखं खूप आहे. पण आणखी एक उदाहरण देतो. ज्या पद्धतीने हे राजकारण सुरू आहे, त्यात त्यांनी ‘ऑपरेशन टायगर’ केलं. त्याचा अर्थ काय? सहा जणांना फोडलं. पण यात गंमत म्हणजे दुर्दैवही आहे. गद्दारांना 50 खोके दिले जातात आणि शेतकऱ्याला 5,000 रुपये दिले जातात. काय तुमची लायकी? काय तुमची दानत? स्वतःच्या खुर्चीखालील सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही 50 कोटी रुपये उधळता आणि ज्या शेतकऱ्यामुळे तुमच्या पोटात दोन घास जातात, त्याला 5,000 रुपये देता? ते सहा खासदार फुटत होते, तेव्हा मिनिटामिनिटाला बातम्या सुरू होत्या. हा इकडे निघाला, तो तिकडे गेला, तो यांना भेटला, हा त्यांच्याकडे गेला—अशा प्रत्येक गोष्टीचं कव्हरेज सुरू होतं. पण त्या वेळी आपण एक गोष्ट विसरलो. राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितलं होतं—ते लोकसभेत सांगितलं असेल किंवा राज्यसभेत, पण त्याबाबत हक्कभंगाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो—की ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी आपलं काही नुकसान झालं नाही. पण वास्तविकता अशी आहे की, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही आपले सहा जवान वीरमरण पावले होते. म्हणजे देशासाठी धारातीर्थी पडलेल्या जवानांची बातमी आपल्याला वर्षभरानंतर कळते; पण गद्दारांची बातमी मात्र आपल्याला प्रत्येक सेकंदाला कळते. हा आहे आजचा मीडिया. आणि हे स्वातंत्र्य नाही. आम्हाला असं स्वातंत्र्य अपेक्षित नव्हतं. आम्हाला असं हिंदुत्वही अपेक्षित नाही. गळ्यात नुसता भगवा घालून मुलींची छेड काढणारे लोक खरे हिंदू नाहीत. जे तरुण आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात, त्यांना तुम्ही काय समजता? तुम्ही म्हणता, “देखते हैं, आते कैसे हैं!” अरे, मुंबईत येऊन बघा. तुमची दांडकी मोडून परत पाठवू. हिंदुत्वाची नासवताय, हिंदुत्वाला बदनाम तुम्ही करत आहात. एकीकडे तुम्ही 12 वर्षं सत्तेत बसलात. स्वतःला विश्वगुरू म्हणवून घेतलंत. तरीही तुम्हाला अजूनही ‘हिंदू खतरे में है’ अशी आवई का मारावी लागते? मग तुम्ही नेमकं केलं काय? हिंदूंना वाचवलं नाही, देशाला पुढे नेलं नाही, काहीच केलं नाही. आणि हे तुम्ही असे पुचाट हिंदुत्ववादी तुमच्यामुळे हिंदू सुरक्षित नाही. हिंदू धर्माची हजारो वर्षांची परंपरा आहे. तुम्ही नव्हता, तेव्हापासून हिंदू धर्म अस्तित्वात आहे. तुम्ही सत्तेतून गेल्यानंतरही हिंदू धर्म पुढे चालूच राहणार आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा मक्ता तुम्ही घेतलेला नाही. हिंदू धर्मात जन्माला आलात, हे तुमचं भाग्य समजा. शिवसेनाप्रमुखांनी हिंदू समाजामध्ये जागवलेल्या भावनेचा गैरफायदा घेऊन तुम्ही सत्तेच्या खुर्चीत बसला आहात. याचं थोडं तरी भान ठेवा. नाहीतर देशाची परिस्थिती फार वाईट होईल. आतापर्यंत तुम्ही अनेक घोटाळ्यांबद्दल ऐकलं असेल. पण मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो. इतक्या वर्षांत भाजपने केलेला सर्वांत मोठा घोटाळा कोणता? ‘संभ्रम घोटाळा’. संभ्रम घोटाळा म्हणजे काय, हे समजून घ्या. समजा, निवडणुकीत आम्ही सगळे उमेदवार आहोत. मी तुम्हाला सांगतो, “मी तुम्हाला चंद्रावर घर देतो.” तुमच्यापैकी कोणाला हे शक्य वाटतं? कोण तयार आहे? कोणीही नाही. तुम्ही काय विचार करणार? चंद्रावर घर मिळणं कठीण आहे, ते मिळणार नाही, असंच तुम्हाला वाटणार. बाकीचे उमेदवार म्हणतात की, हे शक्य नाही. पण एक जण छातीठोकपणे सांगतो, “मी देतो! एकदा देऊन तर बघा!” आणि लोक फसतात. अशी स्वप्नं दाखवायची की लोक फसून जातात. अशक्य गोष्टी सांगायच्या. ज्या गोष्टी कधीही होऊ शकत नाहीत, हे आपल्यालाही माहीत असतं; पण ‘देऊन तर बघू’ असं म्हणत लोकांना भुलवलं जातं. याच पद्धतीने ते जिंकत आले आहेत. स्वतःबद्दल संभ्रम निर्माण करायचा की, आम्ही काहीतरी विश्वगुरू आहोत, आम्ही चंद्रावर घर देऊ शकतो. आणि दुसरीकडे विरोधकांची बदनामी करायची. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्यांचं चारित्र्यहनन करायचं. नंतर कळतं की, त्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नव्हतं. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, आयुष्य निघून गेलेलं असतं, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.
मनमोहन सिंह यांचं उदाहरण घ्या. त्यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप करण्यात आले. किती गदारोळ केला! हा सगळा प्रचार तुम्ही सत्तांतर घडवून आणण्यासाठी आणि राजकीय परिस्थिती बदलण्यासाठी केला होता ना? मनमोहन सिंह सत्तेवरून पायउतार झाले. त्यांच्यावरील घोटाळ्याची केस अनेक वर्षं चालली. त्यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी त्या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता झाली. मग कशाला केला हा कांगावा? विरोधकांना आयुष्यातून उठवायचं, खोटेनाटे आरोप करायचे आणि तेच आरोप वारंवार करत राहायचे. सतत तेच बोललं की लोकांनाही ते खरं वाटायला लागतं. मनमोहन सिंह यांच्या प्रकरणात निकाल लागायला अनेक वर्षं लागली. पण आमचे चंपतराय दोन महिन्यांत सुटले. चंपतराय यांच्याबाबत 105 वेळा चोरी झाल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसले. तरीही केवळ चंपतराय त्यांचे असल्यामुळे त्यांना क्लीन चिट दुसरीकडे, मनमोहन सिंह यांच्याबाबत आरोप करत राहायचं, त्यांना ‘चिटर’ म्हणत राहायचं. हाच यांचा सर्वांत मोठा घोटाळा आहे, संभ्रम घोटाळा! मी यापूर्वी जे बोललो होतो, त्या मतावर आजही ठाम आहे. आपल्या सोन्यासारख्या आयुष्यातील 25 वर्षं यांच्यासोबतच्या युतीत वाया गेली. हे मी पुन्हा सांगतो. खोट्या माणसांना आपण डोक्यावर घेतलं, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली
आता त्यांनी अलीकडे काय केलं, हेही पाहिलं. संजय यांनी ‘जेन झी’बद्दल सांगितलं. खरंच कमाल आहे! कदाचित देशातील पहिला राजकीय पक्ष किंवा संघटना आम्ही असू, ज्यांनी अभिजीत दीपके यांना पहिल्याच दिवशी जाहीर पाठिंबा दिला. आजही माझा पाठिंबा कायम आहे. “आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं!” या जेन झी तरुणांनी एक चांगली रील तयार केली आहे. त्यात दोन मित्र दाखवले आहेत. त्यांच्यातला संवाद असा आहे. “अरे, बता तो जरा, पहले देश कैसा था और अब कैसा है?” त्यावर दुसरा विचारतो, “तो पहले देश कैसा था?” त्याचं उत्तर असं आहे की, “हम मंदिर बनाते थे, बाहर के लोक लुटते थे, लेकिन हम आत्मनिर्भर तो कैसे?” म्हणजे आपण मंदिरं बांधतो, पण त्याच वेळी आपण आत्मनिर्भर आहोत का? मंदिरं आपणच बांधतो आणि ती लुटतोही आपणच! पण आता आपल्याला नव्या तयारीने पुढे जावं लागेल. मोदीजी सुरुवातीला म्हणाले होते, “अब देश बदल रहा है.” होय, देश बदलतो आहे. देशाला आता जाग आली आहे. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात दाखवल्याप्रमाणे, माझ्या भारतमातेलाही आता जाग आली आहे. ही जागृती आता कोणीही थांबवू शकणार नाही. “देश बदल रहा है”, “अच्छे दिन आएंगे”—वाटायला लागलं आहे. पण फक्त ‘अच्छे दिन आएंगे’ असं म्हणत राहून चालणार नाही. तुम्हा सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे—“होय, हम अच्छे दिन लाएंगे!” आहे एवढी हिंमत? हम अच्छे दिन लाएंगे, आणि उद्या जे सत्ताबदलाचं रणकंदन होणार आहे, त्यात माझा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, शूरवीर आणि साधुसंतांचा महाराष्ट्र हा भवानी तलवारीसारखा तळपला पाहिजे. महाराष्ट्र तसा तळपेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.



























































