
राळेगाव तालुक्यातील वडकी गावालगत असलेल्या पिंपळापूर मार्गावरील नाल्याला आलेल्या पुरामुळे गुरुवारी दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. थोड्याशा पावसातही पूल पाण्याखाली जात असल्याने शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांना तासन्तास अडकून पडावे लागले. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
वडकी, पिंपळापूर आणि वडगाव परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून या पुलाची उंची वाढविण्याची मागणी करीत आहेत. मात्र, प्रत्येक पावसाळ्यात पूल पाण्याखाली जात असल्याने वाहतूक खंडित होते आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. याकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गुरुवारी झालेल्या पावसानंतर नाल्याला मोठा पूर आल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे बंद झाली. शाळेतून घरी परतणारे विद्यार्थी, शेतातील कामावरून परतणारे शेतकरी व शेतमजूर तसेच अन्य नागरिकांना तासन्तास पुलाच्या दोन्ही बाजूंना थांबावे लागले. पर्यायी मार्ग नसल्याने अनेकांची गैरसोय झाली.
याप्रकरणी पिंपळापूरचे सरपंच रवींद्र चौधरी यांनी लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली. दरवर्षी हाच प्रकार घडतो. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असतानाही पुलाच्या उंचीवाढीसाठी कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. केवळ आश्वासने दिली जातात. प्रत्यक्षात मात्र प्रश्न जैसे थेच आहे, असे त्यांनी सांगितले.
पुलाची उंची वाढविल्यास ही समस्या कायमची सुटू शकते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या प्रश्नाची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पुलाची उंची वाढविण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.































































