माझं सिलेक्शन झालं नाही! सुसाईड नोट लिहित 19 वर्षीय महिला क्रिकेटपटूने जीवन संपवलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करूनही वरिष्ठ संघात स्थान न मिळाल्याच्या धक्क्यातून नागपुरातील लक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या आदिती मोरेश्वर चौखंडे हिने आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली असून, त्यात ‘माझं सिलेक्शन झालं नाही’ एवढीच ओळ लिहिलेली आढळली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण क्रीडा वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मूळची अकोला येथील रहिवासी असलेली आदिती चौखंडे यापूर्वी विदर्भाच्या अंडर-15 संघातून क्रिकेट खेळली होती. अकोल्यात सुरुवातीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्या क्रिकेट करीअरला नवी उंची देण्यासाठी ती दोन वर्षांपूर्वी नागपुरात आली होती. नागपुरातील लक्ष्मीनगर चौकात असलेल्या उमालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये ती तिच्या आईसोबत राहत होती आणि शहरातील सुर्वे क्रिकेट अकादमीमध्ये दररोज कठोर सराव करत होती. एक व्यावसायिक क्रिकेटपटू बनून मोठय़ा स्तरावर ओळख निर्माण करण्याचे तिचे स्वप्न होते. तिचा भाऊ प्रज्वल हासुद्धा क्रिकेटपटू असून तो अकोल्यात वडिलांसोबत राहतो.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, नुकत्याच पार पडलेल्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या निवड प्रक्रियेत आदितीची निवड होऊ शकली नव्हती. या अपयशामुळे ती गेल्या काही दिवसांपासून प्रचंड निराश आणि मानसिक तणावाखाली होती. याच नैराश्यातून गुरुवारी पहाटे तिने घरातच फाशी घेऊन आपले जीवन संपवले.