CWG 2026 – शेवटच्या क्षणी सुवर्ण हुकलं, पण पठ्ठ्यानं इतिहास घडवला; शिवणकाम करणाऱ्याच्या मुलाने रौप्यपदक पटकावलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये हिंदुस्थानच्या लव्हप्रीत सिंग याने इतिहास रचला आहे. गुरुवारी रात्री शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत लव्हप्रीत सिंग याला अवघ्या एक किलोच्या फरकाने सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. मात्र राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 110+ किलो वजनी गटात राष्ट्रीय विक्रम मोडत लव्हप्रीतने रौप्यपदकावर नाव कोरले. न्यूझीलंडच्या डेव्हिड अँड्र्यूज लिटी याने सुवर्णपदक, तर इंग्लंडच्या अँड्र्यू ग्रिफिथने कांस्यपदक जिंकले.

पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील बाल सिकंदर गावचा रहिवासी असलेल्या 28 वर्षीय लव्हप्रीतने एकूण 388 किलो वजन उचलले. लव्हप्रीतने स्नॅचमध्ये 176, तर क्लीन अँड जर्कमध्ये 212 किलो वजन उचलले. लव्हप्रीतने स्नॅच प्रकारात अप्रतिम सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात 168 किलो आणि दुसऱ्या प्रयत्नात 173 किलो वजन सहज उचलल्यानंतर, तिसऱ्या प्रयत्नात 176 किलो वजन उचलून त्याने राष्ट्रकुल स्पर्धेचा नवीन विक्रम प्रस्थापित केला. या कामगिरीमुळे स्नॅच फेरीत त्याने प्रतिस्पर्ध्यांवर 10 किलोची भक्कम आघाडी घेतली होती.

मात्र, क्लीन अँड जर्क फेरीत न्यूझीलंडच्या लिटीने पुनरागमन केले. लव्हप्रीतने 212 किलो वजन उचलून सुवर्णपदकावर पकड मजबूत केली होती. अंतिम प्रयत्नात त्याने 217 किलो वजनाचे आव्हान स्वीकारले, परंतु ते उचलण्यात तो अपयशी ठरला. याचा फायदा घेत लिटीने क्लीन अँड जर्कमध्ये 223 किलोचा नवा स्पर्धा विक्रम रचत एकूण 389 किलोसह सुवर्णपदक पटकावले.

दरम्यान, लव्हप्रीतच्या या रौप्यपदकामुळे हिंदुस्थानच्या वेटलिफ्टिंग पथकाने 1 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 कांस्य अशा एकूण 8 पदकांसह आपल्या यशस्वी मोहिमेचा सांगता केली.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा – महाराष्ट्राच्या दिलीप गावितची ‘सोनेरी’धाव; हिंदुस्थानला तिसरे सुवर्ण, बासिलला रौप्य

लव्हप्रीतची पार्श्वभूमी अतिशय सामान्य असून त्याचे वडील शिंपी, तर आजोबा भाजी विक्रीचा व्यवसाय करत असत. कौटुंबिक व्यवसायाऐवजी खेळाकडे वळत त्याने वयाच्या 13 व्या वर्षी वेटलिफ्टिंग सुरू केले. आज त्याची गणना हिंदुस्थानातील सर्वोत्तम वेटलिफ्टरमध्ये होते.