
नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्याथ्यांच्या आंदोलनावरून एक आंबा चोरला तर फाशी देणार का? असे असंबद्ध वक्तव्य करणारे भाजपचे नेते, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता पुन्हा एकदा अजब विधान केले आहे. ‘दिल्ली आंदोलनासंदर्भात पोलिसांनी एक अत्यंत धक्कादायक आणि विस्तृत अहवाल तयार केला आहे. तो पाहिल्यास कोणालाही चक्कर येईल. तसेच या आंदोलनावेळी झालेल्या दगडफेकीतील प्रत्येक दगड पोलिसांनी गोळा केला आहे. दगडांवरील बोटांचे ठसे (फिंगरप्रिंट्स) ‘आधार कार्ड’शी लिंक केले जाणार असून, त्याआधारे तपास केला जाईल,’ असा दावा चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
पोलिसांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून दिल्लीतील या विद्यार्थी आंदोलनाचे विश्लेषण केले आहे. यामध्ये ज्यांना पकडले आहे, त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आणि आंदोलनामागील हेतू आता स्पष्ट झाला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर लाठीचार्ज आदेशाचे आरोप केले आहेत; पण आता पोलिसांच्या पुराव्यांसमोर त्यांनाही स्वतःचे दावे सिद्ध करावे लागणार आहेत. दिल्ली पोलिसांच्या या अहवालातून विरोधकांची पोलखोल होणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
‘आंदोलक संसदेत घुसले असते तर देशाची स्थिती काय झाली असती, याचा विचार विरोधकांनी करावा. या आंदोलनाला परदेशातून मदत मिळत असल्याची आणि काही समाजकंटक यामध्ये घुसल्याची खात्रीशीर माहिती सरकारकडे होती. जोपर्यंत आंदोलक संसदेच्या दिशेने निघाले नाहीत, तोपर्यंत प्रशासनाने त्यांना रोखले नाही. जर हे आंदोलक संसदेत घुसले असते, तर देशाची स्थिती काय झाली असती, याचा विचार विरोधकांनी करावा,’ असेही ते म्हणाले.
यावेळी आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.





























































