
>> प्रसाद रमेश लाड
कर्ण हा कौरवांच्या बाजूने लढला, म्हणून तो खलनायकाच्या रांगेत दिसतो एवढंच; पण युद्ध संपल्यावर कर्णाबाबतचं सत्य जेव्हा समोर येतं, तेव्हा पांडवही गलितगात्र होतात, असं काहीसं अजिंक्य रहाणेवर टीका करणाऱ्यांचं आज होत असेल. कारण अखेर अजिंक्यने निवृत्ती पत्करली. संघात आपली निवड होऊच शकत नाही हा आगरकरी फॉर्मेट त्याला अखेर समजला आणि ’गंभीर’पणे त्याने निवृत्तीचा मार्ग स्वीकारला. पण अजिंक्य सहजासहजी क्रिकेटप्रेमींच्या मनातून नाहीसा होणार नाही. कारण त्याचं कर्तृत्व कायम मनात घर करून राहणारं आहे.
आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने दमदार अर्धशतक झळकवलं. ट्वेण्टी-20 आणि एकदिवसीय सामन्यातील अखेरच्या सामन्यात अजिंक्य नाबाद राहिलेला; पण तरीही तो संघातून बाहेरच राहिला. एका वनडे मालिकेत तर पाचही सामन्यांत त्याची अर्धशतकं होती, तरीही पुढच्या मालिकेत तो संघाबाहेर होता. हे अजिंक्यच्या बाबतीतच घडू शकतं, कारण आपल्या यशाचं योग्य मार्केटिंग त्याला कधीच करता आलं नाही. किंवा झालेल्या अपमानाला कधीच वाचा फोडता आली नाही. तो कोणाला जाब विचारत नाही, प्रतिकार करत नाही. पुणाला अंगावर घेत नाही. कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेत नाही. त्याची बाजू धरून लावणारं कोणी नाही. त्यामुळे सर्वात सॉफ्ट टार्गेट तोच ठरला. यंदाच्या आयपीएलमध्ये केकेआरच्या अखेरच्या सामन्यात सर्वाधिक धावाही अजिंक्यच्या नावावर आहेत, पण तरीही पुढच्या वर्षीची हमी त्याला देता येणार नाही.
ऑस्ट्रेलियाचा दौरा कोण कसा विसरेल. कोहलीच्या नेतृत्वात हिंदुस्थानी संघ पराभूत झाला होता. पराभवाच्या निखाऱ्यांवर तो संघाला सोडून गेला. तो फक्त पराभव नव्हता, तर लक्तरं वेशीवर टांगलेली होती. अवघ्या 36 धावांत हिंदुस्थानचा संपूर्ण संघ माघारी परतला होता. त्या पराभवाच्या राखेतून भरारी घेणं हे कर्मकठीण काम होतं. पण अजिंक्यने ते शिवधनुष्य पेलवलं. हिंदुस्थानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. अजिंक्यनं मेलबर्नच्या कसोटीत फक्त शतक झळकवलं नव्हतं, तर भारताच्या कामगिरीवर हसणाऱ्यांचे दात त्याने घशात घातले होते. एक कर्णधार बदलला तर किती फरक पडू शकतो हे त्याने त्यावेळीच थंड डोक्याने दाखवून दिलं होतं. ऑस्ट्रेलियाचे महान कर्णधार इयान चॅपेल यांनी अजिंक्यच्या नेतृत्वाचं काwतुक केलं होतं. यापूर्वीही जेव्हा धरमशालामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना होता, अन् कोहली खेळणार नव्हता, तेव्हा हा काटेरी मुकूट अजिंक्यच्याच डोक्यावर चढवला होता. त्यावेळीही अजिंक्यने भारताला विजय मिळवून दिला होता. पण तेव्हाही त्याची दखल घेतली गेली नाही आणि ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक विजयानंतरही नाहीच नाही. हिंदुस्थानी संघाला किंवा बीसीसीआयला त्याचं महत्त्वच कळलं नाही. अजिंक्य म्हटलं की पुन्हा कर्णच आठवतो. या गादीसाठी तू राजपुलातला नाहीस, असं त्याला नियती सांगत आली आहे. काही क्षणासाठी त्याला गादीवर बसता येतं. तो राज्यही करतो. प्रजेला सुखीही ठेवतो, पण त्याला या गादीचं सुख मात्र मिळत नाही.
आपण हिरा आहोत हे या दुनियेत सातत्याने बिंबवावं लागतं. कारण जमाना मार्केटिंगचा आहे. कचकडय़ांनाही कोटींची किंमत मिळते. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले गादीवर बसतात. ती गादी उबवतात. त्यांचा उदो उदो होतो, पण अजिंक्यसारखा खेळाडू त्या गादीचा पाईक होऊन हातात झेंडा घेऊन उभाच राहतो. अजिंक्यकडे काय नव्हतं, तंत्रशुद्ध फलंदाजी होती, फटक्यांमध्ये नजाकत होती, आक्रमक नेतृत्व होतं. कोणतीही जबाबदारी पेलवण्याचं सामर्थ्य होतं. अजिंक्य की रोहित, ट्वेन्टी-20 साठी चांगला सलामीवीर कोण, याची चर्चा काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटूंमध्ये सुरु होती. त्यावेळी अजिंक्यचंच नाव आघाडीवर होतं. कारण कमी चेंडूंमध्ये अजिंक्य खेळपट्टीवर स्थिरस्थावर होतो, हा त्याचा सर्वात चांगला गुण आहे. पण रोहितसारखी त्याची कारकीर्द फुलली नाही. धोनी फॉर्मात नसतानाही त्याला प्रसिद्धी मिळत होती, पण अजिंक्यच्या पदरात मात्र निखारेच पडत राहिले.
सचिन गेला, सेहवाग आला, धोनी आला, रोहित-कोहली आले, पण राहुल द्रविड मात्र शापितच राहिला. संघासाठी काय नाही केलं त्याने. यष्टिरक्षण केलं, नेतृत्व केलं, पण अखेर तो शापितच राहिला. शापित मनसबदारांची कहाणी येथेच संपत नाही. कारण अजिंक्य योद्धा असूनही रहाणे अखेर शापित गंधर्वच ठरला.
ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक मालिका विजय
रहाणेच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा अध्याय म्हणजे 2020-21चा ऑस्ट्रेलिया दौरा. अॅडलेडमध्ये हिंदुस्थानचा डाव अवघ्या 36 धावांत आटोपल्यानंतर आणि विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर नेतृत्वाची धुरा रहाणेकडे आली. मेलबर्नमध्ये झळकवलेल्या शतकाच्या जोरावर त्याने टीम इंडियात नवचैतन्य निर्माण केले. त्यानंतर गब्बाच्या अभेद्य किल्ल्यावर ऑस्ट्रेलियाला धूळ चारत हिंदुस्थानने 2-1 अशी ऐतिहासिक मालिका जिंकली. हिंदुस्थानी क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात गौरवशाली विजयांपैकी एक मानले जाते. परदेशातील खेळपट्टय़ांवर रहाणेची बॅट अधिकच तळपली. वेलिंग्टन, लॉर्ड्स, मेलबर्न, किंग्स्टन आणि कोलंबो येथे त्याने कसोटी शतके झळकवत हिंदुस्थानच्या मधल्या फळीचा विश्वासार्ह फलंदाज म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.





























































