डहाणूच्या महालक्ष्मी गडावर दरड कोसळली; मार्ग झाला धोकादायक, वीज, पाणीपुरवठा खंडित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी गडावर दोन ठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे गडावर जाणारा रामशेत मार्ग धोकादायक झाला आहे. भूस्खलनामुळे गडावरील पिण्याच्या पाण्याची मुख्य पाइपलाइनदेखील तुटल्याने मंदिर परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच विजेचे सात ते आठ खांब कोसळल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून रस्त्यावर झाडे आणि मातीचा ढिगारा आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली आहे.

महालक्ष्मी गडावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच महालक्ष्मी मंदिर विश्वस्त मंडळ, स्थानिक व्यावसायिक, पुजारी आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर आलेली झाडे आणि माती हटवण्याचे काम हाती घेतले. मोठमोठे दगड असल्याने मार्ग मोकळा करण्यात अडचणी येत होत्या.

महालक्ष्मी गडावर मुसळधार पावसाने भूस्खलन झाल्याने गडावर जाणारा रस्ता बंद करण्यात आल्याने भाविकांना मातेच्या दर्शनासाठी जाता येत नाही. प्रशासनाने गडावर जाणाऱ्या रस्त्यावर पडलेले दगड, माती, पोल हटवून सुरक्षित उपायोजना करावी.

गिरीश राऊत, जिल्हाप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे).

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

गेल्या काही वर्षांत महालक्ष्मी गड परिसरात भूस्खलन आणि दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरवर्षी लाखो भाविक गडावर दर्शनासाठी येत असल्याने भविष्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना करावी. दरड प्रतिबंधक कामे आणि भाविकांसाठी मूलभूत सुविधा उभारण्यात याव्यात आदी मागण्या मंदिर ट्रस्टने केल्या आहेत.