मराठमोळ्या अजिंक्य रहाणेची क्रिकेटमधून निवृत्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियातील शांत, संयमी आणि संकटसमयी संघाचा आधारस्तंभ ठरलेला मराठमोळा अजिंक्य रहाणे अखेर गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला. सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ पोस्ट करत रहाणेने आपल्या 12 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला. त्याच्या निवृत्तीने हिंदुस्थानी क्रिकेटमधील एका सुवर्णपर्वाचा शेवट झाला.

रहाणे झाला भावुक!

निवृत्ती जाहीर करताना रहाणे भावुक झाला. ‘फलंदाजीत योग्य टायमिंगवर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. आज निवृत्ती जाहीर करण्यासाठीही हीच योग्य वेळ असल्याचे मला वाटते. डोंबिवलीहून सरावासाठी केलेल्या प्रवासापासून ते टीम इंडियाची पॅप घालण्यापर्यंतचा प्रत्येक क्षण मी देशासाठी जगलो. माझ्यासाठी संघ आणि देश नेहमी स्वतःपेक्षा मोठे होते,’ असे त्याने म्हटले. बीसीसीआय, मुंबई क्रिकेट असोसिएशन, सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, आयपीएल फ्रँचायझी, कुटुंबीय आणि चाहत्यांचे आभार मानत त्याने अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

रहाणेने 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी-20 सामने खेळले. या कालावधीत त्याने एकूण 8,414 आंतरराष्ट्रीय धावा आणि 15 शतके झळकवली. कसोटीत 5,077 धावा आणि 12 शतके, वन डेत 2,962 धावा व तीन शतके, तर टी-20मध्ये 375 धावा अशी त्याची कामगिरी राहिली.