
दिवा परिसरातील रेल्वे उड्डाणपुलासाठी परिसरातील अनेक इमारती पालिकेने जमीनदोस्त केल्या, त्यामुळे शेकडो रहिवासी बेघर झाले. विकासाच्या नावाखाली त्यांनी त्याग केला असूनही अजूनपर्यंत रेल्वे उड्डाणपुलाचा प्रकल्प रखडला आहे. याच प्रकल्पाच्या जवळ एका इमारतीचे बेकायदा बांधकाम सध्या सुरू असून त्याकडे ठाणे महापालिका प्रशासनाने कानाडोळा केला आहे. हे बांधकाम करणाऱ्या माफियांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख अॅड. रोहिदास मुंडे यांनी केली आहे.
टॅक्स ऑफिसलगत एका बेकायदा इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे, तत्कालीन बीट निरीक्षक संतोष लहाने, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त, संबंधित उपायुक्त तसेच अतिक्रमण विभागाचे उपायुक्त यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी केल्या, पण कोणतीही प्रभावी कारवाई झाली नसल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. संबंधित विकासकावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त नागरगोजे, तत्कालीन बीट निरीक्षक संतोष लहाने यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दिवा उड्डाणपूल प्रकल्पासाठी सामान्य नागरिकांची घरे पाडली जातात, परंतु त्याच प्रकल्पाच्या मार्गावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जाते. हा प्रकार भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा असून प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय शक्य नाही. या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडण्यात येईल.
अॅड. रोहिदास मुंडे (उपजिल्हाप्रमुख)





























































