
आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी इन्कम टॅक्स रिटर्न अर्थात ‘आयटीआर’ दाखल करण्याची अंतिम मुदत आज, ३१ जुलै २०२६ पर्यंत आहे. प्राप्तीकर कायद्यानुसार, विहित मुदतीनंतर आयटीआर दाखल केल्यास विलंब शुल्क आकारले जाऊ शकते. एकूण उत्पन्न ५ लाखांपर्यंत असल्यास १,००० रुपये, तर ५ लाखांपेक्षा जास्त असल्यास ५,००० रुपये विलंब शुल्क आकारले जाईल.
केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित
उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे चारधाम यात्रा दोन दिवस थांबवण्यात आली होती. परंतु, आज सकाळी सहा वाजता यात्रा सुरू झाली असताना केदारनाथ मार्गावर जोरदार पाऊस आणि भूस्खलन झाल्याने ही यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मार्ग खुला करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. गौरीकुंड राष्ट्रीय महामार्गावरील रामपूर बाजारजवळ दरड कोसळली आहे.
ओडिशाला पुराचा फटका, तिघांचा मृत्यू
ओडिशात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पुराचा फटका जवळपास दोन लाख लोकांना बसला आहे. यामध्ये बालासोर, भद्रक, जाजपूर, मयूरभंज, संबलपूर आणि धेनकानल या सहा जिल्ह्यांना सर्वाधिक पुराचा फटका बसला आहे. केओंझार जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनांमध्ये तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये भिंत कोसळून एका वृद्धाचा, पुरात बुडून एका मुलाचा आणि विजेचा धक्का लागल्याने अग्निशमन जवानाचा मृत्यू झाला.
चंदीगड विद्यापीठात विद्यार्थिनीचा मृत्यू
चंदीगडमधील पंजाब विद्यापीठ कॅम्पसमध्ये विजेचा धक्का लागल्याने एका २८ वर्षीय पीएचडी स्कॉलर विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर विद्यापीठात एकच खळबळ उडाली. त्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन करत विद्यापीठ प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप केले. अखेर विद्यापीठ प्रशासनाने या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना १६ लाखांची नुकसानभरपाई आणि तिच्या भावाला नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे.



























































