
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण आणि सुमारे १० लाखांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा बारामतीतील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप याच्याविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फिर्याद दिलेल्या बारामतीतील माजी पदाधिकारी तरुणीने २७ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या सभेत घुसून अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.
फिर्यादी महिला आणि आरोपी मंगेश जगताप यांची २००७ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. या काळात जगताप याने त्यांना लग्नाचे आश्वासन दिले होते; परंतु २०१२ मध्ये जगताप याने विवाह केल्याचे समजताच फिर्यादी महिलेने त्याच्याशी संबंध तोडले. मात्र, काही काळाने आरोपीने पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला. आपण पत्नीपासून घटस्फोट घेणार असल्याचे सांगत, त्याने काही प्रतिज्ञापत्रे आणि कागदपत्रे दाखवून फिर्यादी महिला व त्यांच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला. घटस्फोटाच्या खोट्या आश्वासनावर विसंबून २०१२ ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत पणदरे येथील फार्महाऊसवर महिलेचे वारंवार लैंगिक शोषण केले. एवढेच नव्हे, तर वेगवेगळ्या कारणांसाठी ऑनलाइन माध्यमातून ८ ते १० लाख रुपये घेऊन आर्थिक फसवणूकही केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर २७ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत फिर्यादी महिला मंगेश जगताप याला जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, त्यांना पाहताच जगतापने पळ काढला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या फिर्यादीने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तिथे उपस्थित पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी तत्परता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हा गुन्हा माळेगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. माळेगावचे सहायक निरीक्षक कुलदीप संकपाळ तपास करत आहेत.






























































