मराठवाड्यात संततधार! शिवारात उत्साह, शेतीकामाला वेग, नांदेडात एक जण पुरात वाहून गेला, हिंगोली, परभणी, लातूरला ‘रेड अलर्ट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘अल् निनो’चे दडपण झुगारून पावसाने दोन दिवसांपासून मराठवाड्यावर संततधार लावली आहे. सर्वदूर झालेल्या पावसामुळे शिवारात उत्साह असून शेतीकामालाही वेग आला आहे. नदी-नाले ओसंडून वाहत असून, लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये असलेल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या पावसाने खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यांत पुराच्या पाण्यात एक जण वाहून गेला.

नांदेड महानगरपालिका नक्की काय करते, यासंदर्भात संशोधन झाले पाहिजे. महापौर शंभर दिवस झाल्याच्या आनंदात मशगुल आहेत. नगरसेवक फक्त गप्पा मारण्यापुरते महापालिकेत येतात. भाजपचा ‘विकास’ कुठे हरवला? असा प्रश्न नांदेडकरांना पडला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या समोर पंधरा फुटांचा महाकाय खड्डा पडला आहे. खड्ड्याचा अंदाज न आल्याने प्रा. चंद्रशेखर एंगडे यांची कार या खड्ड्यात कोसळली. प्रा. एंगडे यांनी वेळीच उडी मारल्यामुळे त्यांचा जीव वाचला. अग्निशामक दलाने ही कार खड्यातून बाहेर काढली. विशेष म्हणजे महापालिकेत रस्ते विकास आराखड्यासंदर्भात बैठक सुरू असतानाच ही घटना घडली.

यंदा अल् निनोचा प्रभाव असल्यामुळे पर्जन्यमानात भयंकर घट होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांपासून ते हवामान खात्यापर्यंत सर्वांनी सांगितले होते. पण सगळ्यांचे अंदाज खोटे ठरवत पावसाने दोन दिवसांपासून धुमशान घातले आहे. सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे मळभ होते. परंतु या पावसाने हे मळभ दूर केले आहे. बुधवार रात्रीपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप गुरुवारी सायंकाळपर्यंत चालू होती. नांदेड जिल्हयात उमरी बाजार आणि मुदखेड तसेच मुगट सर्कलमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. गेल्या २४ तासांत जिल्हयात ३५.५० मिमी पावसाची नोंद झाली.

किनवट तालुक्यात कंचली येथील ग्रामपंचायतचा सेवक राजू रेड्डी दंडेलू (३२) हा पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पुरात वाहून गेला. हिंगोली जिल्ह्यात पहाटेपासूनच संततधार सुरू आहे. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, नदी नाले, ओढे खळाळून वाहत आहेत. जिल्ह्यात २४ तासांत २०.१ मिमी पावसाची नोंद झाली. कळमनुरी तालुक्यात सर्वाधिक ३२.७ मिमी, तर सेनगावात केवळ ८.८ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील ४८ तासांसाठी हवामान खात्याने जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ दिला आहे.

लातूर जिल्ह्यात तीन दिवसांपासून भीजपाऊस असल्याने सुकण्याच्या मार्गावर असलेली खरीप पिके तरारली आहेत. मात्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी अजूनही भरपूर पावसाची आवश्यकता आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १९.३ मिमी पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यात आज सकाळपासून रिमझिम चालू आहे. आज चांगला पाऊस झाला असला तरी १३.२ टक्के तूट कायम आहे. जून महिना साधारण कोरडाच गेला. अगदी तुरळक पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांच्या तगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

जुलैच्या सुरुवातीला थोडा पाऊस झाला. त्यावर पिकांनी तग धरला, परंतु पिकांची वाढ मात्र खुंटली होती. कालपासून होणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदी पिकांना जीवदान मिळाले आहे. बीड जिल्हा अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. खंडित पडणाऱ्या या पावसामुळे खरीप हंगाम कसातरी तग धरून आहे. गुरुवारी सकाळपासूनच जिल्हाभरातील बहुतांश भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. अधूनमधून पडणाऱ्या या दिवसभराच्या सरीमुळे घायतुकीला आलेल्या खरीप हंगामाला जीवदान मिळाले आहे.

परभणी जिल्ह्यात पावसाळ्याचा दुसरा महिना संपत आला असताना अखेर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने गुरुवारी सकाळपासून जोरदार रूप धारण केले असून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागांत सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवनावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. हवामान विभागाने परभणी जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, तसेच नदी-नाले व पुलांवरून प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनानेही आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवून परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले आहे.