
डॉ. मनमोहन सिंग हे सर्वार्थाने ‘मि. क्लीन’ होते. ते सिद्ध करण्यासाठी त्यांना कुठल्याच न्यायालयाच्या ‘दोषमुक्ती’ प्रमाणपत्राची गरज नाही. तरीही कोळसा खाण वाटप प्रकरणी अशा चारित्र्यवान नेत्याच्या वाट्याला हयातीत दोष आणि मरणोत्तर दोषमुक्ती यावी, हे देशाचे दुर्दैव! हा व्यवस्थेच्या कोडगेपणाचा कळस आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी मोदींनी एका स्वच्छ राजकीय चारित्र्याला डागाळण्याचे पाप केले. मि. मोदी, या पापाचे प्रायश्चित्त घ्या! तोच एकमेव पर्याय आहे.
कोळसा खाणवाटप घोटाळाप्रकरणी दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने ‘क्लीन चिट’ दिली आहे. न्यायालयाचा हा निर्णय मनमोहन सिंग यांच्यावरील ‘नसलेला’ एकमेव डाग धुऊन काढणारा आहे. अर्थात त्याबद्दल न्यायालयाचे आभार मानायचे की हा निकाल डॉ. सिंग यांच्या हयातीत का आला नाही म्हणून न्यायालयालाच सवाल करायचा? डॉ. सिंग यांच्यावरील एक राजकीय शिंतोडा मरणोत्तर का होईना, पुसला गेला म्हणून समाधान व्यक्त करायचे की डॉ. सिंग यांना जिवंतपणी हे समाधान मिळाले नाही म्हणून दुःख व्यक्त करायचे? डॉ. सिंग आणि तत्कालीन यूपीए सरकारवर आरोपांची राळ उडवून राजकीय स्वार्थ साधलेल्या आजच्या सत्तापक्षाचा बुरखा फाटला म्हणून आनंद मानायचा की निकाल वेळेत न दिल्याने या मंडळींना राजकीय लाभ उपटण्याची संधी मिळाली म्हणून नाराजी व्यक्त करायची? आजोबांच्या खटल्याचा निकाल नातवाच्या काळात लागणे ही आपल्याकडे तशी सर्वसाधारण बाब आहे. मात्र या
कोडगेपणाचा फटका
डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या व्यक्तीलाही का बसावा? ओडिशातील तालबिरा-2 कोळसा खाणीच्या वितरणाशी निगडीत हे प्रकरण होते. 2015 मध्ये विशेष न्यायालयाने डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काही लोकांना त्यासंदर्भात समन्स बजावले होते. पुढे त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती वगैरे दिली. मात्र प्रकरण तसेच ‘न्यायप्रविष्ट’ राहिले. आता डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या दीड वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने डॉ. सिंग यांच्यावरील आरोप फेटाळले आणि हे प्रकरण पूर्णपणे बंद केले. त्यांना ‘क्लीन चिट’ दिली. हे सगळे ठीक असले तरी या निर्णयाला जो प्रचंड विलंब झाला त्याचे समर्थन कसे करणार? डॉ. सिंग यांच्यावर दोन दशकांपूर्वी राजकीय आरोप होतात आणि त्यातून त्यांची ‘दोषमुक्ती’ त्यांच्या निधनानंतर दीड वर्षांनी होते. हा आपल्याकडील राजकीय आणि न्यायप्रक्रियेच्या कोडगेपणाचा आरसा आहे. या आरशात पंतप्रधान मोदी यांनी आणि न्याय व्यवस्थेनेदेखील स्वतःला पाहायला हवे. देशाचे सत्ताधारी आणि न्याय व्यवस्था यांच्या दिव्याखालील अंधार गेल्या दहा-बारा वर्षांत जास्तच गडद झाला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांना आज मिळालेली ‘दोषमुक्ती’ दहा वर्षांपासून याच
अंधारात चाचपडत
होती. आज हा अंधार सर्वोच्च न्यायालयाने दूर केला आहे. तथापि, डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या सज्जन, प्रामाणिक आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवन देणाऱ्या पंतप्रधानाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या पक्षाचे काय? आपण डॉ. सिंग यांच्यावर खोटे आणि राजकीय आरोप केले, अशी कबुली आता पंतप्रधान मोदी देतील का? त्यासाठी देशाची राहू द्या, निदान डॉ. सिंग यांच्या आत्म्याची तरी माफी मागतील का? डॉ. मनमोहन सिंग हे सर्वार्थाने ‘मि. क्लीन’ होते. ते सिद्ध करण्यासाठी त्यांना कुठल्याच न्यायालयाच्या ‘दोषमुक्ती’ प्रमाणपत्राची गरज नाही. तरीही कोळसा खाण वाटप प्रकरणी अशा चारित्र्यवान नेत्याच्या वाट्याला हयातीत दोष आणि मरणोत्तर दोषमुक्ती यावी, हे देशाचे दुर्दैव! हा व्यवस्थेच्या कोडगेपणाचा कळस आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी मोदींनी एका स्वच्छ राजकीय चारित्र्याला डागाळण्याचे पाप केले. मि. मोदी, या पापाचे प्रायश्चित्त घ्या! तोच एकमेव पर्याय आहे.































































