
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी सत्ताधारी भाजपवर आज गंभीर आरोप केला. ‘जंतरमंतरवर आंदोलन सुरू असताना भाजपशी संबंधित लोकांकडून मला अनेक धमक्या आल्या होत्या. आंदोलन मागे घेऊन भाजपमध्ये या, नाहीतर ठोकू. गोळ्या घालू… अशा शब्दांत मला धमकावण्यात आले होते’, असे दीपके यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. ‘सीजेपीचे आंदोलन सुरू असताना मी सतत दबावाखाली होतो. भाजपमध्ये आला नाहीत तर तुमचे कुटुंब अडचणीत येईल. तुम्हाला ठोकू, अशी धमकी मला दिली गेली. भाजप आणि संघाची ही प्रेमाची भाषा आहे. मी मोदी, शहा यांच्या नातवाच्या वयाचा आहे. मला धमकी देताना लाज वाटली पाहिजे,’ असा संतापही दीपकेंनी व्यक्त केला. सीजेपी तरुण पिढीची दिशाभूल करत असल्याच्या आरोपांचाही दीपकेंनी समाचार घेतला. ‘विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी आणि लोकशाहीसाठी लढणे, सरकारला प्रश्न विचारणे याला दिशाभूल म्हणत नाहीत. असे केल्याने संस्कृती बिघडते असे कोणाला वाटत असेल तर होय आम्ही संस्कृती बिघडवत आहोत, असे दीपके यांनी ठणकावले. रामदेव बाबांनी संस्कृतीची चिंता करण्याऐवजी पतंजलीच्या खराब प्रोडक्ट्सकडे लक्ष द्यावे. ते सुधारावे, असा टोलाही दीपकेंनी हाणला.
जेन-झी उद्या देश चालवणार आहेत!
जेन झी तरुणांना काही लोक ट्रोल करत असल्याकडे लक्ष वेधले असता दीपके म्हणाले, ‘जेन झींना ट्रोल करून काय करणार? तेच उद्याचे नागरिक आहेत. तेच मतदार होतील, तेच उद्या देश चालवणार आहेत. ते कुठल्या पक्षाचे किंवा विचारधारेचे नाहीत. त्यांना ट्रोल करून कोणाला काहीही मिळणार नाही.’
शहांनी राजीनामा दिलाच पाहिजे!
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेली अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी योग्यच आहे. जंतरमंतर’वर विद्यार्थ्यांचे रक्त सांडले गेले, ते अमित शहांच्या आदेशाशिवाय होऊच शकत नाही. दिल्ली पोलिसांना तेच आदेश देतात. त्यांना ते माहीत नसेल तर त्यांचे अपयश आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे दीपके म्हणाले.
ईडी-सीबीआयचा वापर करून शिवसेना, एनसीपी फोडली!
‘आपल्या देशात लोकशाहीच धोक्यात आलेली आहे. न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तपास यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात आहेत. ईडी, सीबीआयचा वापर करूनच आपल्या राज्यात शिवसेना, एनसीपी हे पक्ष फोडण्यात आले. मीडिया स्पष्टपणे सरकारच्या बाजूने आहे. हे सगळे थांबवायचे असेल तर फक्त विरोधी पक्षांनीच नाही तर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे,’ असे दीपके म्हणाले.
प्रधानांना काढून आणखी एक विचित्र माणूस बसवला
नव्या शिक्षणमंत्र्यांवरही त्यांनी भाष्य केले. ‘प्रधानांना काढून आणखी एक विचित्र माणूस बसवला आहे. या माणसाने बलात्काऱयांचे स्वागत केले होते. पण सगळेच गुंड भरलेले असल्याने भाजप तरी काय करणार? कुलदीप सेंगर कोण होता? भाजपच्या कार्यकाळात रामरहीम पॅरोलवर बाहेर येतो. गुंड आणि बलात्काऱयांचे समर्थन करणारे हे सरकार आहे,’ असे टीकास्त्र त्यांनी सोडले.




























































