“लापता गृहमंत्री” कोठे आहेत, आम्ही त्यांचा शोध घेत आहोत; संजय राऊत यांचे राज्यसभेत तडाखेबंद भाषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेपरलिक विरोधी विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे आंदोलन, विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि पेलेट गनचा वापर यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. हा विषय सत्ताधारी किंवा विरोधकांचा नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा असल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

भाषणाची सुरुवात करताना संजय राऊत यांनी कवी पाश यांच्या दोन ओळी सांगितल्या. सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना! सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना! या प्रमाणे देशातील अनेकांचे स्वप्न मारले गेले आहे. 20जुलै रोजी जंतरमंतर येथे त्या स्वप्नांवर लाठीचार्ज झाला, अश्रूधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या, लाठ्यांना खिळे ठेकून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर पेलेट गन चालवत विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे ते म्हणाले.

या सभागृहात असे अनेक नेते आहे, ज्यांची कारकिर्द विद्यार्थी चळवळ, आंदोलनापासून सुरू झाली. सभागृहात असे नेते असताना अशी घटना घडणे दुर्दैवी आणि दुःखद आहे. विद्यार्थ्यांवर लाठीमार झाला. त्यांचे उपोषण आंदोलन सुरू होते. त्या विद्यार्थ्यांना भेटावे, त्यांच्या समस्या जाणून घ्यावा, त्यांच्याशी संवाद साधावा, असे एकाही नेत्याला वाटले नाही. अनेकदा आणीबाणीचा उल्लेख करण्यात येतो. पण त्याची सुरुवातही विद्यार्थी आंदोलनापासून झाली होती. तर आताचे सरकार विद्यार्थी आंदोलनाला का घाबरत आहे? असा सवाल त्यांनी केला.

देशातील शिक्षण पद्धतीत सुधारणा व्हाव्यात, शिक्षण पद्धतीतील भ्रष्टाचार संपवा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. मात्र, या आंदोलनाला पंतप्रधान, गृहमंत्री घाबरले, ते बेपत्ता झाले आहेत. आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. लापता गृहमंत्री असा चित्रपट बनवण्याचा आपला विचार आहे. आता कुठे आहेत गृहमंत्री? प्रत्येक गोष्टीचे क्रेडिट घेणारे गृहमंत्री, प्रत्येक गोष्टीवर तावातावाने बोलणारे गृहमंत्री आता कोठे आहेत? असा सवालही त्यांनी केला.

एवढे मोठे आंदोलन झाले, विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला, पेलेट गन चालवण्यात आल्या. एवढे होऊनही गृहमंत्र्यांनी एकही वक्तव्य, निवेदन दिले नाही. पंतप्रधान रात्री 12 वाजता वक्तव्य करतात. हा सत्ताधारी, विरोधकांचा प्रश्न नाही. महाराष्ट्रात पेपरलिक घोटाळ्यात सर्व जास्त लोकांना महाराष्ट्रात अटक करण्यात आली. त्यात भाजपशी संबंधित अनेकांचा समावेश आहे. NEET ही फक्त परीक्षा नसून अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा, जीवन-मरणाचा प्रश्न आहे. मात्र, सरकारच्या यंत्रणांतील त्रुटींमुळे परीक्षेत घोळ असेल तर सरकारला याची जबाबदारी घ्यावी लागेल. आता आणलेल्या कायद्यात नवे काहीही नाही. त्यामुळे या कायद्याने काहीही बदलणार नाही. पेपर सेट करण्यापासूनची सगळी व्यवस्थाच बदलण्याची गरज आहे. ही सर्व व्यवस्थाच सरकारने उद्ध्वस्त केली आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.