
सामनाचा दणका
रस्तोरस्ती पडलेले खड्डे, पंधरा दिवसांतून कधीतरी येणारे पाणी, फुटलेल्या ड्रेनेजमधून वाहणारे पाणी… असे कर्तबगारीचे ओझे वाहणाऱ्या महापालिकेने नगरसेवकांचा राजेशाही पाहुणचार करण्याचा घाट घातला होता. मात्र या महागड्या पाहुणचाराची पोलखोल ‘सामना’ने करताच स्थायी समितीने हा प्रस्ताव स्थगित केला.
मनपाच्या सर्वसाधारण, स्थायी समिती तसेच इतर सभांसाठी येणाऱ्या नगरसेवकांचा शाही पाहुणचार करण्यात येणार आहे. त्यासाठी नगरसचिवांनी आज होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेसमोर प्रस्ताव ठेवला. दीडपट जास्तीचे दर असणारा हा प्रस्ताव चर्चेला येण्यापूर्वीच वादग्रस्त ठरला. वाळूजपासून शेंद्रापर्यंत आणि बिडकीनपासून हरसूलपर्यंत कुठेही जा चहा दहा रुपयांना मिळतो. पण नगरसेवकांना देण्यात येणारा चहा चक्क ३८ रुपयांना लावण्यात आला. कॉफीही ३८ रुपयांना. बिस्किट पुडा १८ रुपये, तर नाश्ता ७० रुपयांना आणि ५९० रुपयांना जेवण देण्याचा हा प्रस्ताव पाहून सभापतींसह सदस्यही बुचकळ्यात पडले.
स्थायी समितीच्या सभेत हा प्रस्ताव चर्चेला येताच सदस्यांनी त्याला तीव्र आक्षेप घेतला. महापालिकेच्या तिजोरीत ठणठणाट आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे लाभ देण्यासाठी महापालिकेकडे पैसे नाहीत, अशी लाजीरवाणी परिस्थिती असताना हा राजेशाही पाहुणचार कशासाठी? असा प्रश्न सदस्यांनी केला. सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन सभापती अनिल मकरिये यांनी या प्रस्तावाला स्थगिती दिली आणि नव्याने दरपत्रक मागवण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले.
नगरसचिवांनी मांडलेल्या प्रस्तावावर सुरेंद्र कुलकर्णी, राजगौरव वानखेडे तसेच माधुरी अदवंत यांनी जोरदार आक्षेप घेतला. हे दरपत्रक पंचतारांकित हॉटेलमधून मागवण्यात आले आहे का, असा प्रश्न माधुरी अदवंत यांनी केला. पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणासाठी हजार रुपये लागतात. महापालिका पंचतारांकित आहे का? आम्हाला पंचतारांकित जेवण देऊ नका, सर्वसामान्यांसाठीचेच जेवण द्या असे अदवंत म्हणाल्या. हे कंत्राट एखाद्या महिला बचतगटाला देण्यात यावे, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.





























































