
जळगाव जिल्ह्यात गुरुवारपासून सुरू असलेल्या संततधार आणि जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, बहुतांश सर्व लहान-मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी वाहू लागल्याने प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. बोरी, अंजनीसह अनेक नद्यांना यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच मोठा पूर आल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सततधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने घरांचे तसेच घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे. स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेती शिवारातून वाहणाऱ्या नाल्यांनाही मोठा पूर आल्याने शेतांमध्ये पाणी साचले आहे. काठावरील शेतांमधील कपाशीसह ज्वारी, उडीद, मूग, सोयाबीन, मका ही पिके पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी उभी पिके आडवी पडली आहेत. पाण्याच्या वेगामुळे सुपीक माती वाहून गेल्याने शेतजमिनींचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिल्याने नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. चोरवड गावाजवळील अंजनी नदीला आलेल्या पुरामुळे पारोळा–भडगाव मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेसह खासगी वाहनांचीही ये-जा ठप्प झाली आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत असताना पर्यायी मार्गांचाही वापर अनेक ठिकाणी अशक्य झाला आहे.
जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर तापी नदीवरील हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता या धरणाचे चार दरवाजे पूर्णपणे, तर ३२ दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले. धरणातून तब्बल १ लाख ८५ हजार ८२८ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने तापी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तापी नदीला पूरस्थिती निर्माण झाल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नदीपात्रात अथवा पुलांवर जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर न पडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.





























































