लापता गृहमंत्री! अमित शहांवर शिवसेनेचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेन झी विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या मुद्दय़ावर मौन बाळगून असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज जोरदार हल्ला चढवला. ’विद्यार्थ्यांचे आंदोलन झाल्यापासून पंतप्रधान, गृहमंत्री घाबरले आहेत. बेपत्ता आहेत. आम्ही त्यांना शोधत आहोत, असे सांगतानाच, आता मी ’लापता गृहमंत्री’ हा चित्रपट काढणार आहे,’ अशी उपरोधिक टीका संजय राऊत यांनी केली.

पेपरफुटी प्रतिबंधक विधेयकावर ते राज्यसभेत बोलत होते. भाषणाच्या सुरुवातीलाच कवी पाश यांची ‘सबसे खतरनाक होता है हमारे सपनो का मर जाना…’ ही ओळ उद्धृत करत संजय राऊत यांनी सरकारला लक्ष्य केले. ’हिंदुस्थानच्या लाखो लोकांची स्वप्नं मारली गेली आहेत. 20 जुलैला जंतरमंतरवर हेच झाले. सभागृहात विद्यार्थी दशेपासून राजकीय चळवळीत असणारे अनेक लोक आहेत. मात्र, सत्ताधारी बाकांवरील कोणालाही या विद्यार्थ्यांशी संवाद साधावासा वाटला नाही, अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली.

‘सभागृहात सतत आणीबाणीचे दाखले दिले जातात. आणीबाणी विरोधी आंदोलनाची सुरुवात विद्यार्थी आंदोलनापासूनच झाली होती. मग आता सरकार विद्यार्थी आंदोलनाला इतके का घाबरते? पंतप्रधान, गृहमंत्री घाबरले. बेपत्ता आहेत. आम्ही त्यांना शोधत आहोत. कुठे गेले गृहमंत्री? प्रत्येक विषयावर वक्तव्य करणारे, क्रेडिट घेणारे गृहमंत्री इतक्या मोठय़ा आंदोलनावर बोलत का नाहीत?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

पेपरफुटीतले सगळे आरोपी भाजपचे

महाराष्ट्रासारख्या शिक्षणाची परंपरा असलेल्या आमच्या राज्यातून पेपरफुटीचे सर्वाधिक आरोपी पकडण्यात आले आहेत. हे सर्व आठ आरोपी भाजपचे आहेत. जे लोक राममंदिराची दानपेटी फुटण्यापासून वाचवू शकत नाहीत, ते पेपर लीक काय थांबवणार, असा सवालही संजय राऊत यांनी केला.