पाकव्याप्त कश्मीरमध्ये तणाव वाढला; निदर्शकांवर गोळीबार आणि अत्याचाराचे आरोप, आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीची हाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकव्याप्त जम्मू-कश्मीरमध्ये (PoJK) सध्या प्रचंड तणावाचे वातावरण असून, जनतेच्या प्रश्नांवरून सुरू झालेल्या आंदोलनाने आता तीव्र रूप धारण केले आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलांकडून निदर्शकांवर अतिरेकी बळाचा वापर, नागरिकांची हत्या आणि माध्यमांवर घातलेल्या निर्बंधांमुळे येथील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर रावळकोट येथील सरदार अमन खान कश्मिरी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अकील या दोन स्थानिकांनी सार्वजनिक निवेदने जारी करून पाकिस्तानी अधिकाऱ्यांवर शांततापूर्ण निदर्शकांवर बळाचा वापर केल्याचा आरोप केला आहे. तसेच येथील वास्तवाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांना थेट प्रवेश देण्याची मागणी त्यांनी केली आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

रावळकोटमधून बोलताना सरदार अमन खान कश्मिरी यांनी पाकव्याप्त काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांच्या वक्तव्यावर कडाडून टीका केली. निदर्शकांना दहशतवादी ठरवल्याचा आरोप फेटाळून लावत ते म्हणाले की, रावळकोटमध्ये जमलेले आंदोलक हे निशस्त्र नागरिक असून ते केवळ आपल्या लोकशाही हक्कांचा वापर करत आहेत. रेंजर्स, पोलीस आणि फ्रंटियर कॉर्प्स यांसारख्या सुरक्षा दलांना शहरातील इमारतींच्या छतावर तैनात करण्यात आले असून, तेथून ते सामान्य नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा गंभीर आरोप अमन खान यांनी केला. जर येथे दहशतवादी असतील, तर पाकिस्तानच्या आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांना तसेच विरोधी पक्षनेत्यांना येथे येऊन स्वतः सत्य पाहू द्या, असे खुले आव्हान त्यांनी पाकिस्तानी सरकारला दिले. हे सामान्य नागरिक उत्तम प्रशासन, रोजगार, शिक्षण आणि न्यायाची मागणी करत असून राज्यकर्त्यांच्या दडपशाहीविरोधात ते रस्त्यावर उतरले आहेत. मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेले हे आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

या आंदोलनादरम्यान आतापर्यंत शेकडो तरुणांना जीव गमवावा लागला असल्याचा धक्कादायक दावा अकील यांनी केला. केवळ गेल्या तीन दिवसांत ४० जणांचा मृत्यू झाला असून, अनेकांच्या छातीत गोळ्या झाडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही एकप्रकारची टार्गेट किलिंग असल्याचा आरोपही त्यांनी केला. या हिंसाचारात मीरपूरमध्ये एका पाच महिन्यांच्या बालकाचाही मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. देशाच्या सुरक्षेसाठी जनतेच्या करातून जमा झालेला पैसा आणि साधनसामग्री आता पाकव्याप्त कश्मीरमधील सामान्य नागरिकांविरुद्धच वापरली जात असल्याची खंत अकील यांनी व्यक्त केली. तसेच या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत आंतरराष्ट्रीय माध्यमांनी येथील विदारक सत्य जगासमोर आणावे, असे आवाहन त्यांनी केले.