
पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड सज्जाद भट याचा निकवर्तीय असणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या दहशतवाद्याला पश्चिम बंगाल एसटीएफने अटक केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा बर्धमान जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. हमीम मोंड असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याच्या मोबाईल फोन आणि कागदपत्रांच्या प्राथमिक तपासणीवरून तो मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्यावर हल्ला करण्याचा कट आखत असल्याचा संशय एसटीएफने व्यक्त केला आहे.
अटक करण्यात आलेला हमीद मोंडल हा 2019 च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार सज्जाद भटचा अत्यंत जवळचा सहकारी आहे. तो गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बर्धमान येथील रेनॉसा टाऊनशिप भागातील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये ओळख लपवून राहत होता. पोलिसांच्या आणि तपास यंत्रणांच्या नजरेतून वाचण्यासाठी त्याने या हाऊसिंग कॉम्प्लेक्सचा आसरा घेतला होता. शुक्रवारी त्याला बर्धमान न्यायालयात हजर केले जाणार असून एसटीएफ त्याची कोठडी मागण्याची शक्यता आहे. ‘इंडिया टीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
An operative of the Jaish-e-Mohammed (JeM) has been arrested from the Renaissance Housing complex in Burdwan by the West Bengal Special Task Force (STF) late last night. He is associated with the Sajjad Bhat module of Jaish-e-Mohammed: West Bengal Police Sources pic.twitter.com/ShNztZMOMy
— IANS (@ians_india) July 31, 2026
दरम्यान, मोंडल गेल्या 9 जुलैपासून मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या कार्यक्रमांचे वेळापत्रक आणि त्यांच्या दौऱ्यांची माहिती गोळा करत होता, असेही समोर आले आहे. या माहितीचा वापर करून नक्की काय कट रचला जात होता आणि या षड्यंत्रात आणखी कोण-कोण सामील आहे, याचा कसून शोध पोलीस घेत आहेत. त्याच्या संपूर्ण नेटवर्कची आणि संपर्कांची सध्या कसून चौकशी सुरू आहे.
40 जवान झालेले शहीद
14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघाती दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेली गाडी सीआरपीएफच्या ताफ्याला धडकवली होती. या भीषण हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते.
स्फोटकांचा साठा जप्त
पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील नलहाटी भागात पोलिसांनी एका बेवारस घरावर छापा मारून बेकायदेशीर स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे मारलेल्या या छाप्यात 800 किलोपेक्षा जास्त अमोनियम नायट्रेट, 1200 हून अधिक जिलेटिनच्या काड्या, 105 डिटोनेटर्स आणि 36 डिटोनेटिंग फ्युझ कॉइल्स जप्त करण्यात आले आहेत.


























































