
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बावनदी येथील जुन्या पुलावर शुक्रवारी सकाळी एका तरुणाने नदीत उडी घेतली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
रेवाळेवाडी (ता. संगमेश्वर) येथील महेश नारायण भरणकर (वय – 42) यांनी सकाळी सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास बावनदी पुलावरून नदीत उडी घेत जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही क्षणांतच त्यांनी नदीत उडी घेतल्याने सर्वांचीच धावपळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून नदी परिसरात महेश याचा शोध सुरू आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून शोधमोहीम पूर्ण होईपर्यंत परिसरात चिंतेचे वातावरण आहे. या घटनेमुळे बावनदी परिसरात मोठी गर्दी झाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.



























































