
नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो तर पेलेट गनच्या वापरावर गृहमंत्र्यांनी राजीनामा का देऊ नये? असा थेट सवाल करत काँग्रेस नेते पवन खेडा यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात झालेला हिंसाचार आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून पवन खेडा यांनी सरकारला घेरले. पवन खेडा यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
पवन खेडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला. पंतप्रधान जेव्हा-जेव्हा भाष्य करतात तेव्हा ते ट्रोल होतात, असा टोला खेडा यांनी लगावला. पंतप्रधान मोदी सोशल मीडियाच्या लाटेवर स्वार होऊन सत्तेत आले होते आणि आता सोशल मीडियाच्या लाटेवरच ते सत्तेतून बाहेर जातील, असा इशारा खेडा यांनी दिला. दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनाचा उल्लेख करत खेडा यांनी तरुणांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.
हिंसाचाराचा बळी ठरलेल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळालाच पाहिजे आणि हिंसा करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. परंतु, पेपरफुटी झाल्यानंतर ज्याप्रमाणे तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि त्यांना जबाबदार धरले जाते, अगदी त्याच धर्तीवर पेलेट गनच्या घटनेची जबाबदारीही गृहमंत्र्यांनी स्वीकारायला हवी. गृहमंत्री अमित शहा यांनी या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी आक्रमक भूमिका पवन खेडा यांनी मांडली आहे.


























































