विदर्भ क्रिकेट असोसिएशनमध्ये सिलेक्शन झाले नाही; नागपुरात 17 वर्षीय तरूणीने उचलले टोकाचे पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूरमध्ये एका 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने नैराश्यातून गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) निवड यादीत नाव न आल्याने ती तीव्र मानसिक तणावाखाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नागपूरच्या लक्ष्मीनगर परिसरात घडली. मृत मुलगी मूळची अकोलाची होती. मागील दोन वर्षांपासून ती आपल्या आईसोबत नागपुरात राहत होती. शिक्षणासोबतच खेळाची आवड असल्याने छंद जोपासत उच्च स्तरावर खेळण्यासाठी मेहनत घेत होती. तिला एक भाऊ असून तोही एक क्रिकेटर होता.

बुधवारी सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास तिने राहत्या घरी जीवन संपवले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट जप्त केली असून, त्यावर “माझी निवड झाली नाही” (Mera selection nahi hua) असे लिहिले होते. यावरून तिचे संघात नाव न आल्यामुळे अत्यंत नाराज असल्याचे स्पष्ट होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.