
जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि त्यांच्या पत्नी पायल अब्दुल्ला या दोघे एकमेकांपासून विभक्त झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी या दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. उमर अब्दुल्ला आणि पायल यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असून एकमेकांविरुद्धचे सर्व सुरू असलेले खटले मागे घेतले आहेत. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निकाल दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी दोन्ही बाजूंचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी त्यांची बाजू न्यायालयात मांडली. ओमर अब्दुल्ला आणि त्यांच्या पत्नी पायल अब्दुल्ला या जोडप्याने त्यांचे सर्व मतभेद पूर्णपणे मिटवले असल्याचे सिब्बल यांनी स्पष्ट केले. दोघांनी स्वतंत्र होण्याचा निर्णय घेत 22 जुलै रोजी संविधानाच्या कलम 142 अंतर्गत याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता घटस्फोटाचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी न्यायालयात केली.
दिल्लीतील ओबेरॉय हॉटेलमध्ये काम करत असताना ओमर अब्दुल्ला आणि पायल यांची भेट झाली आणि 1994 मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांना झहीर आणि जमीर अशी दोन मुले आहेत. पण 2009 पासून हे जोडपे वेगळे राहत होते. मात्र 2011 मध्ये ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या 17 वर्षांच्या वैवाहिक जीवनातून विभक्त झाल्याची जाहीर घोषणा केली होती.
























































