
गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या संततधार पावसानंतर शुक्रवारी भारतीय हवामान विभागाने (IMD) यवतमाळ जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला. संभाव्य अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. मात्र दिवसभर अपेक्षित मुसळधार पाऊस न पडल्याने हवामान विभागाच्या अंदाजाच्या अचूकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रेड अलर्ट जाहीर होताच पालकांनी मुलांना घरीच ठेवले, शाळा बंद राहिल्या, अनेक व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी आपली नियोजित कामे पुढे ढकलली. प्रशासनाने संभाव्य धोका लक्षात घेऊन खबरदारी घेतली. मात्र दिवसभर अनेक ठिकाणी अधूनमधून ऊन, ढगांची वर्दळ आणि किरकोळ सरी एवढेच चित्र पाहायला मिळाले. मुसळधार पावसाचा मागमूसही दिसला नाही. त्यामुळे ‘रेड अलर्ट’चा पुन्हा एकदा फुसका बार ठरल्याची चर्चा जिल्हाभर रंगली.
विद्यार्थ्यांना आयती सुट्टी मिळाली, मात्र पालकांची कामे विस्कळीत झाली. व्यापाऱ्यांनाही व्यवसायावर परिणाम सहन करावा लागला. शासकीय कार्यालयांपासून खासगी व्यवहारांपर्यंत अनेक नियोजनांवर या इशाऱ्याचा परिणाम झाला. त्यामुळे वारंवार दिले जाणारे अतितीव्र इशारे आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यातील तफावत नागरिकांच्या नाराजीचे कारण ठरत आहे.


























































