लग्नानंतर सासऱ्यांना हार्टअटॅक, सासरच्यांकडून अशुभ ठरवत छळ; आठ महिन्यांतच विवाहितेने मृत्यूला कवटाळलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हुंडा आणि अंधश्रद्धेतून होणाऱ्या छळाला कंटाळून डेहराडूनच्या डोईवाला येथे लग्नानंतर आठ महिन्यांतच विवाहितेने जीवन संपवलं. मृत्यूपूर्वी तिने आईला व्हिडिओ मेसेज पाठवला होता. त्यात आता सहन होत नाही, असे म्हटले होते. सृष्टी कंडारी असे मयत विवाहितेचे नाव असून ती सरकारी शाळेवर शिक्षिका होती. सृष्टीच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून डोईवाला पोलिसांनी तिचा पती सौरभ रतुरी, सासू परवीना देवी आणि नणंद चारू यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिताच्या कलम 80(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, सृष्टी कंडारी हिचा विवाह नोव्हेंबर 2025 मध्ये हर्रावाला येथील सरकारी कर्मचारी सौरभ रतुरी याच्याशी झाला होता. लग्नानंतर तीन महिन्यांनी सृष्टीच्या सासऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर नवीन सुनेच्या पायगुणाने घरात दुर्दैवी घटना सुरू झाल्याचे एका पुजाऱ्याने कुटुंबाला सांगितले. तेव्हापासून सृष्टीला ‘मनहूस’ (अशुभ) म्हटले जाऊ लागले आणि घरातील प्रत्येक संकटासाठी तिलाच जबाबदार धरले जाऊ लागले.
सासऱ्यांच्या निधनानंतरच्या दिवसांत हा मानसिक दबाव अधिकच वाढला होता.

हुंडा आणि अंधश्रद्धेमुळे होणाऱ्या सततच्या मानसिक छळामुळे तिला आत्महत्येसारखे पाऊल उचलण्यास भाग पाडले गेले, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. 28 आणि 29 जुलै रोजी मुलीशी फोनवर संपर्क होऊ न शकल्याने एका ओळखीच्या व्यक्तीला तिची विचारपूस करण्यासाठी पाठवल्यानंतर तिच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना समजली. सासरच्यांनी त्यांना मृत्यूची माहिती दिली नाही. फोन करण्यासाठी वेळ नसल्याचे कारण पुढे केले, असा आरोप मयत विवाहितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.