
केंद्र सरकारच्या नियमानुसार १२ सागरी मैल पलीकडील खोल समुद्रात उद्या दि.१ ऑगस्टपासून मासेमारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र १२ सागरी मैलांच्या बाहेर मासेमारी करण्यासाठी केंद्र सरकारचा परवाना असणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात फक्त ३०५ मच्छिमारांकडे केंद्र सरकारच्या जलधी क्षेत्रात मासेमारी करण्याचा परवाना आहे.
१२ सागरी मैलांच्या आत म्हणजे महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी १५ ऑगस्ट पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मात्र केंद्र सरकारची १ जून ते ३१ जुलै दरम्यान मासेमारी बंदी होती. उद्या दि.१ ऑगस्टपासून केंद्र सरकारच्या नियमांनुसार मासेमारी सुरू होणार आहे.त्यामुळे १२ सागरी मैलांच्या बाहेर खोल समुद्रात मासेमारी करता येणार आहे. मात्र केंद्र सरकारच्या जलधी क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी केंद्र सरकारचा परवाना असणे आवश्यक आहे.
बंदरावर मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांची करडी नजर
केंद्र सरकारचा परवाना असलेल्या ३०५ नौका जिल्ह्यात असल्याने सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त उद्यापासून १२ सागरी मैलांच्या बाहेर होणाऱ्या मच्छिमारीवर लक्ष ठेवणार आहेत.सागरसुरक्षा रक्षकांना तशा सुचना देण्यात आल्या आहेत. मासेमारी करून येणाऱ्या प्रत्येक नौकेचा परवाना बंदरात तपासण्यात येणार आहे.


























































