
विद्यार्थी आंदोलकांवरील गोळीबाराच्या मुद्द्यावरून लोकसभेत दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाळ यांनी शुक्रवारी केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. २० जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या संसद चलो मोर्चावर पोलिसांकडून झालेल्या कारवाईदरम्यान कोणताही गोळीबार झाला नसल्याचे सांगून जितेंद्र सिंह यांनी कनिष्ठ सभागृहाची दिशाभूल केल्याचा दावा वेणुगोपाळ यांनी केला आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
लोकसभेच्या कामकाजाचे नियम आणि कार्यपद्धतीच्या नियम २२२ अंतर्गत हा नोटीस देण्यात आला आहे. यात वेणुगोपाळ यांनी केंद्रीय राज्यमंत्री सिंह यांच्याविरुद्ध हक्कभंग कार्यवाही सुरू करण्याची मागणी केली असून हे प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठवण्याची विनंती लोकसभा अध्यक्षांना केली आहे. २९ जुलै रोजी परीक्षा सुधारणा विधेयक, २०२६ वरील चर्चेदरम्यान सिंह यांनी दिलेल्या उत्तराचा संदर्भ वेणुगोपाळ यांनी या नोटीसमध्ये दिला आहे.
सभागृहात सिंह यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, पोलिसांकडून कोणताही गोळीबार झालेला नाही आणि केवळ अश्रुधुराचा वापर करण्यात आला होता. गोळीबार झालाच नसल्याने तसे आदेश देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा दावा त्यांनी केला होता. मात्र हे विधान पूर्णपणे वस्तुस्थितीच्या विपरित असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मंत्र्यांच्या दाव्याच्या उलट प्रत्यक्ष गोळीबार झाला असून जखमी व्यक्तीवर अद्यापही वैद्यकीय उपचार सुरू आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध असल्याचे वेणुगोपाळ यांनी म्हटले आहे.
गोळीबार झाला नसल्याचा खोटा दावा करून मंत्र्यांनी जाणीवपूर्वक सभागृहात चुकीची माहिती दिली असून संसदेची दिशाभूल केली आहे, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. संसदेची दिशाभूल करणे हा विशेषाधिकाराचा भंग आणि सभागृहाचा अवमान ठरतो. देशाच्या सर्वोच्च विधिमंडळात माहिती मांडण्यापूर्वी मंत्र्यांनी वस्तुस्थितीची पडताळणी करणे अपेक्षित असते, असे सांगत वेणुगोपाळ यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

























































