
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग येत्या सप्टेंबर महिन्यात नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी हिंदुस्थानमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात २०२० मध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर शी जिनपिंग यांचा हिंदुस्थानचा हा पहिलाच दौरा असेल. गलवानमधील संघर्षामुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
शी जिनपिंग १२-१३ सप्टेंबरला हिंदुस्थान दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. गलवानमधील संघर्षानंतर सहा वर्षांनी जिनपिंग यांचा हा हिंदुस्थान दौरा असेल. जिनपिंग आतापर्यंत तीन वेळा हिंदुस्थान दौऱ्यावर आले आहेत. ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांनी शेवटचा हिंदुस्थान दौरा केला होता. त्याच्या काही महिन्यांनंतर लडाखच्या गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आले होते.
शी जिनपिंग यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली आणि बीजिंगदरम्यान राजनैतिक हालचालींना वेग आला आहे. उच्चस्तरीय चर्चेसाठी हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवल चीन दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. सध्या या दौऱ्याच्या तारखा निश्चित केल्या जात आहेत. याशिवाय, येत्या काही आठवड्यांत हिंदुस्थान-चीन सीमाविषयक ‘वर्किंग मेकॅनिझम फॉर कन्सल्टेशन अँड कोऑर्डिनेशन’ (WMCC) ची बैठक पार पडण्याची शक्यता आहे.

























































