
खडकवासला धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पुण्यात मुठा नदीला पूर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खडकवासला धरण आणि त्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी ३ वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग ३५,५७४ क्युसेकवरून वाढवून थेट ४३,५७१ क्युसेक इतका करण्यात आला आहे.
धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे मुठा नदीला पूर आला असून नदीकाठच्या परिसराला पाण्याचा वेढा पडला आहे. सिंहगड रोड परिसरातील सखल भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून तेथील एकतानगरी आणि विठ्ठलनगर भागांत पाणी शिरले आहे.
नदीची वाढती पातळी पाहता मुठा नदीकाठच्या सर्व गावांना, वस्त्यांना आणि सखल भागातील नागरिकांना प्रशासनाने अत्यंत सावधानतेचा इशारा दिला आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली असून नागरिकांनी नदीपात्राजवळ जाऊ नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






























































