
बीड जिल्ह्यात एका सरकारी अधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक वनीकरण खात्याच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४५ लाख रूपयाची लाच घेताना अटक केली आहे.
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार एकीकडे विकास आराखडा मांडत असताना विविध विकास कामांचे भूमिपुजन करत असताना मी मराठवाड्याची लेक आहे, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जबाबदारीने काम करणार असे आश्वासीत करत असताना दुसरीकडे विभागीय वन अधिकारी असलेला श्रीनिवास लखमावार याला ४५ लाख रूपयांची लाच घेताना संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात जेरबंद केले. श्रीनिवास लखमावार याने गतवर्षी वृक्ष लागवडीचे बीले मंजूर करून देण्यासाठी कर्मचार्याचे थकीत वेतन अदा करण्यासाठी तसेच निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी ४५ लाख रूपयाची लाच मागितल्याची तक्रार देण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वीच अशी तक्रार छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विभागाकडे दाखल करण्यात आली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी दुपारी सापळा रचला. यावेळी श्रीनिवास लखमावार याला ४५ लाख रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. यामध्ये पाच लाख रूपयांच्या खर्या नोटा आणि इतर मनोरंजनाच्या नोटा दिल्यानंतर पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केल्यानंतर एसीबीचे अधिक्षक माधुरी कांगणे बीडमध्ये दाखल झाल्या. गेल्या काही वर्षामध्ये बीडमध्ये लाचखोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. प्रत्येक महिन्याला लाच घेताना कोणीतरी पकडला जातो. ही शोकांतिका आहे.




























































