
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवर पेलेट गनद्वारे हल्ला करणाऱया दिल्ली पोलिसांच्या व पर्यायाने केंद्र सरकारच्या निषेधार्थ आजही विरोधकांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली. याच मुद्दय़ाला आज विरोधकांनी अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिरातील दानपेटीतील चोरीच्या मुद्दय़ाची जोड दिली. त्यामुळे सभागृहात जोरदार गोंधळ झाला. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. त्यामुळे आता सोमवारपासून तिसऱ्या आठवड्याृत तरी संसदेचे कामकाज सुरळित चालणार की नाही, याबद्दल साशंकता आहे.
लोकसभेचे कामकाज सुरू होताच केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी जन्म मृत्यू नोंदणी संदर्भातील विधेयक मांडले ते आवाजी मतदानाने मंजूरही करण्यात आले. त्यानंतर सभागृहात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली. त्यामुळे सुरुवातीला कामकाज दुपारी बारा, त्यानंतर दोन व नंतर सोमवारपर्यंत तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली.
राज्यसभेतही गदारोळाची मालिका कायम राहिली. चंदा चोरी व जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील हल्ला या दोन्ही मुद्दय़ांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे कामकाज दुपारी बारा त्यानंतर सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.

























































